India maldive row : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यावर मालदीवच्या मंत्र्यांनी आक्षेपार्ह कमेंट केली होती. त्यानंतर भारत आणि मालदीवमधील संबंध बिघडले. मालदीवच्या राष्ट्राध्यक्षपदी चीन समर्थक मुइझ्झू यांची निवड झाल्यापासून दोन्ही देशातील संबंध बिघडले आहेत. ‘इंडिया आउट’चा नारा देणारे मुइज्जू पहिल्याच अधिकृत दौऱ्यासाठी चीनला गेले. भारतीय सैन्याला त्यांनी माघारी बोलवण्याची मागणी केली. यानंतर भारताने चर्चेतून मार्ग काढला. पण तरी देखील मालदीवचे भारतावर आरोप सुरुच आहे.
मालदीवमधून भारतीय सैन्याच्या माघारीवर चर्चा सुरू असतानाच आता नवा आरोप केला आहे. मालदीव आणि भारत यांच्यात कोअर ग्रुपची आज दुसरी बैठक झाली. भारतासोबत सैन्य मागे घेण्याबाबत करार झाला असल्याचा दावा मालदीवने केला असला तरी भारत सरकारने याला दुजोरा दिलेला नाही.
मालदीव सरकारने आरोप केला आहे की भारतीय तटरक्षक दलाचे कर्मचारी त्यांच्या विशेष आर्थिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मालदीवच्या तीन मासेमारी जहाजांवर चढले. या घटनेबाबत मालदीव भारत सरकारकडे घटनेची सर्वंकष माहिती देण्याची मागणी करत आहे. मात्र, मालदीवच्या या आरोपांवर भारत सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
मालदीवच्या संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी एका निवेदनात दावा केला की, 31 जानेवारी रोजी, भारतीय लष्कराने मालदीवच्या विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये (EEZ) मासेमारी कार्यात गुंतलेली मालदीवची मासेमारी नौका अडवली. मालदीवने भारतावर आंतरराष्ट्रीय सागरी कायदे आणि नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
सध्या मालदीवमध्ये ७७ भारतीय सैनिक उपस्थित आहेत. भारताने मालदीवला भेट म्हणून दिलेल्या दोन हेलिकॉप्टर आणि एक विमानाच्या देखभालीसाठी ते तेथे तैनात आहेत. या शिवाय मानवहिताच्या कामासाठी त्यांना तेथे तैनात करण्यात आले आहे. हिंद महासागरात मालदीवचे स्थान भौगोलिकरित्या महत्त्वाचे आहे. जर मालदीवमधून भारतीय सैन्य माघारी आले तर चीन तेथे आपले वर्चस्व प्रस्थापित करेल. ज्याचा भारताला फटका बसू शकतो. म्हणून भारत मालदीवला इतके महत्त्व देत आहे.