बांग्लादेशची राजधानी ढाका येथे सोमवारी परिस्थिती वेगाने बिघडली. लाखो आंदोलक गोनोभोबोनच्या दिशेने चालून येत होते. गोनोभोबोन हे बांग्लादेशच्या पंतप्रधानांच अधिकृत निवासस्थान आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा, हीच आंदोलकांची एकमेव मागणी होती. आंदोलक वेगाने चाल करुन येत होते. अधिकाऱ्यांनी कॅलक्युलेशन केलं, शेख हसीना यांच्या हातात शेवटची 45 मिनिटं होती. जवळच्या व्यक्तींच ऐकून आपल्याच माणसांविरोधात बळाचा वापर थांबवावा की, तिथून निघून जायचं? हे दोनच मार्ग शेख हसीना यांच्यासमोर होते. हसीना 2009 पासून बांग्लादेशात सत्तेवर होत्या. त्यांनी देश सोडण्याचा निर्णय घेतला. पण या निर्णयाप्रत येण्याआधी समजूत घालणं, फोन कॉल्स, बैठका बरच काही सुरु होतं.
बांग्लादेशमधील शेख हसीन यांचे ते शेवटचे काही तास होते. परिस्थितीमुळे अखेर त्या भारतात निघून आल्या. बळाचा वापर करून किंवा इतर दुसऱ्या मार्गाने सत्ता टिकवण्याच्या प्रयत्नात शेख हसिना शेवटपर्यंत त्यांच्या भूमिकेला चिकटून राहिल्या होत्या. ढाका स्थित प्रोथॉम आलो वर्तमानपत्राने ही बातमी दिलीय. देशाबाहेर पळण्याआधी त्यांनी सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रचंड प्रयत्न केला. सोमवार सकाळी 10.30 पासून हे सर्व सुरु होतं. बांग्लादेशच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने लोक गोनोभोबोनकडे निघाले होते. रविवारी 98 बांग्लादेशींची हत्या झाली, म्हणून विद्यार्थ्यांनी गोनोभोबोनवर धडकण्याचा संकल्प केला होता.
रविवारी रात्रीच लष्कराकडे सत्ता सोपवायला सांगितलेली
शेख हसीना यांना तीन आठवड्यांपासून सुरु असलेलं आरक्षण विरोधी आंदोलन हाताळताच आलं नाही. याची परिणीत त्यांची सत्ता जाण्यात झाली. राजीनामा देऊन भारतात येण्याआधी काय घडलं? त्या घडामोडी समोर आल्या आहेत. परिस्थितीची तीव्रता, गांभीर्य लक्षात घेऊन आवामी लीगच्या नेत्यांनी त्यात त्यांचे वरिष्ठ सल्लागारही आहेत, रविवारी रात्री त्यांना लष्कराच्या हाती सत्ता सोपवण्याचा सल्ला दिला होता. पण त्या सल्ला मानायला तयार नव्हत्या.
आदेश झुगारले
सल्ला मानण्याऐवजी उलट हसीना यांनी सोमवारपासून कर्फ्यूचे आदेश दिले. इंटरनेट सेवेसह बांग्लादेशमध्ये सर्वकाही बंद करण्याचे आदेश दिले. आंदोलकांनी कर्फ्यूचे आदेश झुगारले. सकाळी 9 वाजल्यापासून लाखो लोक ढाक्यामध्ये रस्त्यावर उतरले.
तिन्ही सैन्य प्रमुखांना शेख हसीना यांनी काय विचारलं?
सकाळी 10.30 वाजता लष्कर, नौदल एअर फोर्स प्रमुख आणि पोलिसांच्या आयजीपी यांना पंतप्रधानांनी गोनोभोबोन निवासस्थानी बोलवून घेतलं. परिस्थिती हाताळता येत नसल्याबद्दल शेख हसीना यांनी तिन्ही सैन्य प्रमुखांवर आपला संताप व्यक्त केला. आंदोलकांविरोधात कठोर पावलं का उचलत नाहीयत तुम्ही? असं त्यांनी विचारलं. मी तुमच्यावर विश्वास ठेऊन या पदावर नेमल्याची आठवण त्यांनी करुन दिली. परिस्थिती हाताळणं कठीण आहे हे अधिकाऱ्यांनी त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण त्या ऐकायला तयार नव्हत्या.
अधिकारी मोठ्या बहिणीशी बोलले
हसीना यांना परिस्थितीच गांभीर्य लक्षात येत नाहीय, हे लक्षात आल्यावर अधिकारी त्यांची मोठी बहिण रेहाना यांना स्वतंत्र खोलीत भेटले. हसीना यांची समजूत काढावी म्हणून त्यांना विनंती केली. त्यानंतर रेहाना हसीन यांच्याशी बोलल्या. परिस्थिती समजावून सांगितली. शेख हसीना तरी आपल्या निर्णयावर ठाम होत्या.
त्या फोन कॉलनंतर शेख हसीना यांनी राजीनामा दिला
अखेर वरिष्ठ अधिकारी हसीना यांचा मुलगा साजीब बरोबर फोनवरुन बोलले. तो परदेशात असतो. पण साजीब बांग्लादेशच्या पंतप्रधानांचा सल्लागार आहे. मुलाबरोबर बोलल्यानंतर शेख हसीना राजीनामा द्यायला तयार झाल्या. तेव्हा जमाव त्यांच्या निवासस्थानापासून 45 मिनिटांवर होता.