Israel-Hamas War | इस्रायली सैन्याने सोमवारी एक यशस्वी स्पेशल ऑपरेशन केलं. त्यांनी दक्षिण गाजा पट्टीतील सुरक्षा बंदोबस्त असलेल्या एका अपार्टमेंटवर हल्ला करुन आपल्या दोन बंधकांची सुटका केली. अजूनही काही इस्रायली नागरिक हमासच्या ताब्यात आहेत. हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायली नागरिकांना विविध ठिकाणी बंधक बनवून ठेवलय. आतापर्यंत इस्रायलने हमासच्या तावडीतून 100 बंधकांची सुटका केलीय. इस्रायलने आज ज्या प्रकारे बंधकांची सुटका केली, ते सुद्धा त्यांचं मोठ यश आहे. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात 67 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला, असं पॅलेस्टाइनच्या रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितलं. दक्षिण गाजाच्या रफा शहरात हे ऑपरेशन करण्यात आलं.
सैन्य ऑपरेशननेच बंधकांची सुटका होईल असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं आहे. सोमवारी त्यांनी याचा पुनरुच्चार केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला विरोध केलाय. तडजोड, चर्चा हाच बंधकांच्या सुरक्षित सुटकेचा एक मार्ग आहे, असं नेतन्याहू यांच्या विरोधकांच म्हणण आहे. फर्नांडो सायमन मार्मन (60) आणि लुईस हर (70) या दोन बंधकांची इस्रायली सैन्याने सुटका केलीय. सात ऑक्टोबरला हमासच्या दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलमध्ये घुसून हल्ला केला. त्यावेळी किबुत्ज निर यित्जाक येथून हमासच्या दहशतवाद्यांनी मार्मन आणि लुईसच अपहरण केलं होतं. त्यांच्याकडे अर्जेंटिनाच नागरिकत्व आहे. संपूर्ण विजय मिळेपर्यंत सैन्य दबावानेच आपल्या सर्व बंधकांची सुटका शक्य आहे, असं नेतन्याहू यांनी म्हटलय.
किती वाजता कमांडो पोहोचले?
इस्रायली सैन्याच्या स्पेशल ऑपरेशनबद्दल सैन्याचे प्रवक्ते डेनियल हगारी यांनी माहिती दिली. बंधकांना रफा येथे एका अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावर ठेवण्यात आलं होतं. हमासचे बंदुकधारी या अपार्टमेंटच्या आसपास तैनात होते. रात्री 1 वाजून 49 मिनिटांनी गोळीबार सुरु असताना स्पेशल फोर्सचे कमांडो या अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावर पोहोचले. त्यानंतर लगेचच मिनिटभरात आसपासच्या भागात हवाई हल्ले सुरु झाले.
स्फोटाचे अनेक आवाज ऐकू आले
बंधकांची दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटका केली. त्यांना जवळच्या सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं. तात्काळ वैद्यकीय सुविधा देऊन त्यांना विमानाने मध्य इस्रायलच्या शेबा मेडिकल सेंटरमध्ये पाठवण्यात आलं. त्यांची प्रकृती आता चांगली आहे. याआधी नोव्हेंबरमध्ये एका महिला सैनिकाला वाचवण्यात आलं होतं. इस्रायली सैन्याने रात्री उशिरा रफामध्ये हवाई हल्ला केला. स्फोटाचे अनेक आवाज ऐकू आले. गाजाच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते अशरफ अल-किद्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात 67 जणांचा मृत्यू झाला.