जकार्ता: इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर आज पहाटे भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.1 एवढी नोंदवली गेली. भूकंपाचा केंद्र बिंदू आचे प्रांताच्या सिंगकिल शहरातील 48 किलोमीटरच्या अंतरावर होता. तर महाराष्ट्रात चंद्रपूरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. मात्र, चंद्रपूर आणि इंडोनेशियात भूकंपामुळे कोणतंही नुकसान झालं नसल्याचं वृत्त आहे.
इंडोनेशियात जोरदार भूकंपाचे झटके बसले. आज पहाटे 6.30 वाजता हे झटके जाणवले. त्यामुळे लोक प्रचंड घाबरले आणि घराबाहेर पडले. जीवमुठीत घेऊन लोक सैरावैरा धावत सुरक्षित ठिकाणी पोहोचले. भूकंपामुळे कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याचं सांगितलं जातं. आर्थिक हानीचीही माहिती अद्याप आलेली नाही.
भूकंपामुळे जीवित वा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही. तसेच त्सुनामीचा अॅलर्टही अजून दिलेला नाही. मात्र, भूकंप प्रचंड जोरदार असल्याने नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. हा भूकंप मेदान येथे जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या परिसरापासून हा विभाग 120 किलोमीटर अंतरावर आहे. उत्तर-पूर्वोत्तर भागात हा परिसर आहे.
या भूकंपाचे झटके ऑस्ट्रेलिया, तिमोर लेस्ते आणि इंडोनेशियात जाणवले. जवळपास 1.4 कोटी लोकांना या भूकंपाचे झटके जाणवले. यूरोपियन मेडिटेरेनियन सीस्मोलॉजिकल सेंटरने ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे.
यापूर्वीही इंडोनेशियाच्या उत्तर सुमात्रामध्ये भूकंपाचे झटके जाणवले होते. 2 जानेवारी रोजी हे भूकंपाचे धक्के बसले होते. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 एवढी नोंदवली गेली होती भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 4 वाजून 10 मिनिटांनी हे भूकंपाचे झटके जाणवले होते. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या खाली 10 किलोमीटरवर होता.
चंद्रपूर शहरातील बाबूपेठ, लालपेठ आणि नांदगाव परिसरातही भूकंप सदृश्य धक्के जाणवले. रात्री अंदाजे 9:30 च्या सुमारास हे भूकंप सदृश्य धक्के जाणवले. अंदाजे 2 किलोमीटर भागामध्ये हा प्रभाव जाणवल्याने या घटनेची कुठल्याच भूकंप मापक यंत्रात नोंद करण्यात आलेली नाही.
तज्ज्ञांच्या मते हे धक्के वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (WCL) च्या भूमिगत खदनींमध्ये अंतर्गत भूस्खलन झाल्याने बसल्याची शक्यता आहे. प्रशासन सध्या या घटनेनंतर कारणांचा शोध घेत आहे.