वेलिंगटन : न्यूझीलंडच्या केरमाडेक बेटाला आज भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची रिश्टर स्केलवर 7.1 एवढी तीव्रता नोंदवली गेली. हा भूकंप अत्यंत शक्तीशाली होता. तो इतका की या बेटासह इतर आजुबाजूच्या बेटांनाही त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या 10 किलोमीटर आत आहे. भूकंप आल्यानंतर काही सेकंद धरती हल्ली. त्यामुळे नागरिक घरातून तात्काळ बाहेर पडले. बायका पोरांना घेऊन ते बाहेरच थांबले. दरम्यान, या भूकंपात किती नुकसान झालं याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या आत 10 किलोमीटरवर होता, असं अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षणातून स्पष्ट झालं आहे. तसेच या भूकंपाच्या 300 किलोमीटर परिसरातील बेटांवर त्सुनामीचा इशारा देण्यता आला आहे. तसा इशारा अमेरिकेच्या त्सुनामी वॉर्निंग सिस्टिमने दिला आहे. तर नॅशनल एमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीने न्यूझीलंडला त्सुनामीचा कोणताही धोका नसल्याचं म्हटलं आहे. न्यूझीलंडचा बराचसा भाग भूकंप प्रवण क्षेत्रात येतो. न्यूझीलंड हे दोन प्रमुख टेक्टोनिक प्लेटांच्या (प्रशांत प्लेट आणि ऑस्ट्रेलियन प्लेट) बाऊंड्रीवर आहे. न्यूझीलंडमध्ये दरवर्षी हजारो भूकंप येतात. रिंग ऑफ फायरवर असल्यामुळे न्यूझीलंडला वारंवार भूकंपाचा झटका बसत असतो.
प्रशांत त्सुनामी इशारा केंद्रानेही न्यूझीलंडमध्ये मोठी त्सुनामी येण्याचं वृत्त नाकारलं आहे. भूकंपाच्या झटक्यानंतर राऊल बेटाच्या दोन ठिकाणी समुद्रात छोट्या छोट्या लाटा उसळल्या होत्या. या केंद्राने नागरिकांना अलर्ट राहण्यास आणि सावधान राहण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, 6 फेब्रुवारी रोजी तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. या शक्तीशाली भूकंपाची रिश्टर स्केलवर 7.8 इतकी नोंद करण्यात आली होती. या भूकंपाचं केंद्र दक्षिण तुर्कीतील गाझियांटेप येथे होता. हे ठिकाण सीरिया आणि तुर्कीच्या बॉर्डरवर आहे. या दोन्ही देशात भूकंपामुळे मोठं नुकसान झालं होतं. या भूकंपात 50 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. तर 5 लाख 20 हजार अपार्टमेंट्स आणि 1 लाख 60 हजार इमारती भूकंपामुळे जमीनदोस्त झाल्या होत्या.