नवी दिल्ली – बलुचिस्तानमधीन (Baluchistan)लहान मुलं आणि मुलीही स्वातंत्र्यासाठी संघर्ष करीत आहेत. पाकिस्तान (Pakistan)-बलुचिस्तानात सुरु असलेल्या गृह कलहात बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यांसाठी लढाई सुरु आहे. याच सगळ्यात दिल्लीत पोहचलेल्या बलुची कार्यकर्त्या आणि प्राध्यापक नायला कादरी बलोच यांनी या लढ्यात भारताने (India)मदत करावी असे आवाहान केले आहे. दहशतवादाचं केंद्र असलेल्या पाकिस्तानला संपवण्यासाठी, बलुचिस्तानशी भारत सरकारने हातमिळवणी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. बलोच सध्या भारत भेटीवर आलेल्या आहेत. पाकव्याप्त काश्मिरातील त्यांनी सांगितलेली परिस्थिती ही अंगावर काटे आणणारी आहे.
पाकव्याप्त काश्मिरात पाकिस्तान सरकारच्या वतीने करण्यात येत असलेल्या अत्याचारांचा पाढाच नायला कादरी यांनी यावेळी वाचला. पाकिस्तानने बलुचिस्तानवर अनधिकृतरित्या कब्जा केला असल्याचा बलुचिस्तानातील नागरिकांचा दावा आहे. बलुचिस्तान स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या नेत्यांनी २१ मार्च रोजी विस्थापितांच्या सरकारचे गठण केले आहे. कॅनडात विस्थापित झालेल्या वरिष्ठ बलुची नेत्या प्राध्यापक नायला कादरी यांना या सरकारचे प्रमुखपद देण्यात आले आहे. सध्या जागतिक पातळीवर या प्रश्नी लक्ष वेधण्याचे काम नायला कादरी करत असून, त्याचाच एक भाग म्हणून त्या सध्या भारत भेटीवर आलेल्या आहेत. पाकिस्तान आणि चीन यांचा एकत्रितरित्या बलुचिस्तानातील बलूच वंश संपवण्याचा कट असल्याचा आरोप विश्व बलूच महिला संघाच्या अध्यक्ष नायला कादरी यांनी केला आहे. पाकिस्तानकडून बलूचींचा नरसंहार सुरु असल्याचा धक्कादायक आरोपही त्यांनी केला आहे.
चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर ज्याला सीपीईसी म्हणूनही ओळखले जाते. त्याच्याबाबतही कादरी यांनी धक्कादायक माहिती सांगितली आहे. हा कॉरिडॉर बलुचिस्तानातील नागरिकांसाठी मृत्यूचे फर्मान असल्याची टीका त्यांनी केली आहे. हा काही इकॉनॉमिक प्रकल्प नसून सैन्याचा प्रकल्प असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. बलुचिस्तानातील बंदरांना विकण्याचा अधिकार कोणत्याही देशाला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. आमच्या पूर्वजांच्या जमिनींवर चिनी आणि पाकिस्तानींच्या वस्त्या निर्माण करण्यात येत असून, आपल्याला तिथून विस्थापित करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बलुचिस्तानासाठी एका हिरोसारखे आहेत, असे वक्तव्य २०१६ साली नायला कादरी यांनी केले होते. या वक्तव्यानंतर त्यावेळी त्यांना मोठी प्रसिद्धीही मिळाली होती. भारत सरकारने परवानगी दिली तर बलुचिस्तानातील विस्थापितांचे सरकार वाराणसीत गठित केले जाईल, असेही त्या म्हणाल्या होत्या. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यांचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या नरेंद्र मोदी यांचे त्यांनी कौतुक केले होते. बलुचिस्तान जर उद्या स्वतंत्र झाला तर तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा लावू असेही त्या म्हणाल्या होत्या.
स्वातंत्र्यांसाठी गेल्या काही वर्षांपासून बलुची नागरिक संघर्ष करीत आहेत. महिनाभरापूर्वी बिलोच लिबरेशन आर्मीच्या जवानांनी पाकिस्तानी सैन्य यंत्रणांविरोधातील हल्ले वाढवले होते. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा म्हणजेच आयएसआयच्या करन शहरातील कार्यालावर रॉकेट डागण्यात आल्याची माहितीही समोर आली होती. याला कुणी अधिकृत पुष्टी दिली नसली तरी त्या परिसरात पोलिसांच्या गाड्या आणि एम्ब्युलन्स पाहायला मिळाल्या होत्या.