Bangladesh : बांगलादेशात शेख मुजीबुर रहमान यांची ओळख पुसण्यासाठी सत्तेत आलेलं तात्पुरतं सरकार प्रयत्न करत आहे. आधी चलनी नोटांवरून शेख मुजीबुर रहमान यांचा फोटो काढून टाकण्यात आला आणि आता ‘जय बांगला’ हा राष्ट्रीय घोषणेला दिलेला राष्ट्रीय दर्जाही हटवण्यात आला आहे. अंतरिम सरकारने उच्च न्यायालयात ऐतिहासिक निर्णयाला आव्हान दिले होते. त्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले. ‘जय बांगला’ ही घोषणा 1971 च्या स्वातंत्र्य लढ्याचे प्रतीक आहे. बांगलादेशचे पहिले पंतप्रधान शेख मुजीबुर रहमान यांनी ती लोकप्रिय केली होती. 2020 मध्ये शेख हसीना सरकारच्या काळात उच्च न्यायालयाने या घोषणेला राष्ट्रीय घोषणा म्हणून घोषित केले होते. सरकारी कार्यक्रम, राष्ट्रीय दिवस आणि शैक्षणिक संस्थांमध्ये त्याचा वापर अनिवार्य करण्यात आला होता.
मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देत ‘जय बांगला’चा राष्ट्रीय नारा म्हणून दिलेला दर्जा रद्द केलाय. सरन्यायाधीश सय्यद रिफात अहमद यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. अतिरिक्त ऍटर्नी जनरल अनिक आर हक म्हणाले, “‘जय बांगला’ यापुढे राष्ट्रीय नारा म्हणून ओळखला जाणार नाही.”
बांगलादेशची राजकीय स्थिती झपाट्याने बदलत आहे. देशाची सांस्कृतिक चिन्हे ही बदलली जात आहेत. शेख मुजीबुर रहमान यांचा फोटो याआधीच नोटांवरून काढून टाकण्यात आलाय. आता ‘जय बांगला’ हा नारा हटवण्यात आल्याने बांगलादेशचे नवे अंतरिम सरकार शेख मुजीब यांचा वारसा नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचं समोर येत आहे.
5 ऑगस्ट रोजी शेख हसीना यांचं सरकार पाडल्यानंतर बांगलादेशात मोठ्या प्रमाणात अस्थिरता निर्माण झाली आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकार ज्या प्रकारे पाऊलं उचलत आहे. त्यावरुन हे दिसून येतंय की, त्यांना देशाची स्थिती पूर्णपणे बदलायची आहे. देशाच्या राजकारणात यामुळे नवीन वाद सुरु होऊ शकतो. मुजीब समर्थक या विरोधात रस्त्यावर उतरु शकतात. बांगलादेशमधील राजकीय भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.