वॉशिंग्टन : एकीकडे जगभरात कोरोना संसर्गाच्या सावटाखाली बहुतांश शाळा बंद आहेत. भारतातही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यता विचारात घेऊन शाळा बंदच ठेवण्यात आल्यात. मात्र, अमेरिकेत काही अंशी शाळा सुरू झाल्यात. मात्र, शाळा सुरू झाल्यानंतर लगेचच अमेरिकेतील शिकागो प्रशासनाने लैंगिक शिक्षणाचा भाग म्हणून धाडसी निर्णय घेतलाय. यानुसार शाळांमध्ये इयत्ता 5 वीपासून पुढील विद्यार्थ्यांना मोफत कंडोम वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शालेय मुलांमध्ये वाढते लैंगिक आजार आणि असुरक्षित गर्भधारणा यावर उपाययोजना म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. मात्र, त्यावर समाजातील काही स्तरातून टीकाही होत आहे (Free condom distribution in School students in Chicago America).
शिकागो प्रशासनाने शाळेतील 10 वर्षांवरील विद्यार्थ्यांना मोफत कंडोम वाटप करण्यास सांगितले आहे. शिकागोच्या पब्लिक स्कुल बोर्ड ऑफ एज्युकेशनने हा निर्णय घेतलाय. या शिक्षण मंडळाने डिसेंबर 2020 मध्येच नवं शिक्षण धोरण निश्चित केलं होतं. मात्र, कोरोनामुळे त्याची अंमलबजावणी आता जुलै 2021 मध्ये होत आहे.
पाश्चिमात्य राष्ट्रं शिक्षणातील क्रांतीकारक पावलांबाबत कायमच पुढे राहिली आहेत. त्यातच तेथील मुक्त वातावरण आणि लैंगिक शिक्षणाबाबतचा खुला दृष्टीकोन यामुळे भारतात आत्ता कल्पनाही करता येणार नाही असे निर्णय होत असल्याचं नेहमीच पाहायला मिळालंय. त्याचीच सध्या पुनरावृत्ती होतेय. अमेरिकेतील संशोधन संस्थांनी केलेल्या रिसर्चमध्ये शालेय विद्यार्थ्यांमध्ये देखील लैंगिक आजारांचं प्रमाण आणि असुरक्षित गर्भधारणा होत असल्याचं समोर आलं होतं.
यानंतर येथील प्रशासनाने या अहवालाची गंभीर दखल घेत तातडीने शिक्षण धोरणात यावर उपाययोजना करण्याचं ठरवलं. यानुसार मुलांमध्ये लैंगिक आजारांचा संसर्ग होऊ नये, एचआयव्ही सारख्या गंभीर आजाराचा धोका होऊ नये आणि कमी वयात असुरक्षित गर्भधारणा होऊ नये यासाठी उपाययोजना म्हणून विद्यार्थ्यांना कंडोम वाटपचा निर्णय घेतला.
अमेरिकेत एकीकडे या निर्णयाला धाडसी निर्णय म्हणत त्याचं कौतूक होतंय, तर दुसरीकडे शिकागो प्रशासनाच्या या निर्णयावर टीकाही होत आहे. सोशल मीडियावर अनेक लोक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहे. अमेरिकेतच नाही तर या निर्णयावर जगातील इतर देशांमध्ये देखील चर्चा सुरू झालीय.
Free condom distribution in School students in Chicago America