जेरुसलेम : इस्रायल आणि हमासमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालला आहे. मागच्या 21 दिवसांपासून दोघांमध्ये युद्ध सुरु आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी आधी हल्ला केला. त्यानंतर इस्रायलने प्रत्युत्तराची कारवाई केली. इस्रायलच्या सततच्या हवाई हल्ल्यांमध्ये गाजा पट्टीत बरच काही उद्धवस्त झालं आहे. इस्रायली सैन्याने गाजा पट्टीत हवाई हल्ले वाढवल्याची माहिती आहे. इस्रायली एअर फोर्साने एकाचवेळी 100 फायटर जेट्समधून गाजा पट्टीत भीषण बॉम्बवर्षाव केला. गाजामधील बहुतांश भागात इंटरनेट सेवा ठप्प आहे. इस्रायली सैन्याने गाझा पट्टीतील हमासच्या ठिकाणांवर बॉम्बवर्षाव केला. इस्रायली सैन्याने मागच्या काही तासात गाजा पट्टीत लागोपाठ हवाई हल्ले केले आहेत, अशी माहिती IDF चे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी दिली.
इस्रायली सैन्याने जमिनीवरील कारवाईचा विस्तार करत अधिक वेग दिला आहे. उत्तर गाजा आणि आसपासच्या भागात IDF चे हल्ले कायम सुरु राहतील असं हगारी यांनी म्हटलं आहे. पॅलेस्टाइन नागरिकांना त्यांनी गाजा पट्टीच्या दक्षिण भागात जाण्याच आवाहन केलय. सैन्याकडून हमासच्या ठिकाणांवर सातत्याने कारवाई सुरु आहे असं आयडीएफच्या प्रवक्त्याने सांगितलं.
दहशतवादी, रुग्णालय आणि टनेल
हमासचे दहशतवादी रुग्णालयात लपले आहेत. गाजा पट्टीतील शिफा रुग्णालय बोगद्याशी जोडलेलं आहे. शिफा रुग्णालयात हमासच कमांड आणि कंट्रोल सेल आहे. रुग्णालय म्हणजे त्यांच्यासाठी अंडरग्राउंड टेरर कॉम्प्लेक्स आहे. हमास पूर्णपणे संपत नाही, तो पर्यंत आम्ही थांबणार नाही अशी इस्रायलने प्रतिज्ञा केली आहे. आम्ही माणस नाही, राक्षसांबरोबर लढतोय असं इस्रायलने म्हटलय.
गाजा पट्टीत आतापर्यंत किती हजार नागरिकांचा मृत्यू?
गाजा पट्टीत आतापर्यंत 7000 पेक्षा अधिक लोक मारले गेले आहेत. 19 हजारपेक्षा जास्त जखमी आहेत. मृतांमध्ये 3 हजारपेक्षा जास्त मुलं आहेत. हमासच्या हल्ल्यात इस्रायलमध्ये जवळपास 1400 नागरिकांचा मृत्यू झाला. हजारो लोक जखमी झाले. इस्रायल-हमास युद्धाची सुरुवात 7 ऑक्टोबरला झालीय. हमासने इस्रायलवर अचानक हल्ला केला होता.