Operation Ajay | Israel-Hamas war पार्श्वभूमीवर आजपासून भारताच ऑपरेशन ‘अजय’

| Updated on: Oct 12, 2023 | 7:55 AM

Operation Ajay | काय आहे हे ऑपरेशन 'अजय'. गरज पडल्यास भारतीय नौदलाच्या युद्धनौकांचा वापर होणार. आज युद्धाचा सहावा दिवस आहे. दिवसेंदिवस या युद्धाची भीषणता वाढत चालली आहे.

Operation Ajay | Israel-Hamas war पार्श्वभूमीवर आजपासून भारताच ऑपरेशन अजय
Operation Ajay Israel-Hamas war
Image Credit source: AFP
Follow us on

जेरुसलेम | इस्रायल-हमास युद्धाची तीव्रता वाढत चालली आहे. इस्रायलने हमासकडून आपला भूभाग परत मिळवला आहे. हमासचे दहशतवादी ज्या मार्गाने घुसले, त्या दक्षिण इस्रायलच्या सीमेवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलं आहे. इस्रायली सैन्य आता गाझा पट्टीत घुसण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी इस्रायली रणगाडे सीमेवर तैनात झाले आहेत. इस्रायलकडून गाझा पट्टीत सातत्याने हवाई हल्ले सुरु आहे. इस्रायलच्या आकाशात फायटर जेट्सचा आवाज ऐकायला मिळतोय. आज युद्धाचा सहावा दिवस आहे. दिवसेंदिवस या युद्धाची भीषणता वाढत चालली आहे. आतापर्यंत दोन्ही बाजूला हजारो मृत्यू झाले आहेत. शत्रू पूर्णपणे हतबल होईल इतकी इस्रायलकडून गाझा पट्टीत बॉम्बफेक सुरु आहे. पण हमासचे दहशतवादी सुद्धा काही ठिकाणी प्रत्युत्तर देतायत. संपूर्ण इस्रायलमध्ये युद्धाचे सायरन सतत वाजत आहेत. हा सायरन वाजल्यानंतर नागरिक लगेच शेल्टर गाठण्यासाठी धावा घेतायत.

इस्रायलमध्ये पुढचे काही दिवस असच चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे राहणाऱ्या नागरिकांसाठी येणारे दिवस सोपे नसतील. युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध देश आपल्या नागरिकांना मायदेशी आणण्याची व्यवस्था करतायत. इस्रायल-हमास युद्धात वॉर झोनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकारने बुधवारी ‘ऑपरेशन अजय’ची घोषणा केली आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित आणण्यासाठी आजपासून ‘ऑपरेशन अजय’ सुरु होणार आहे. भारत सरकारने आपल्या नागरिकांना इस्रायलमधून मायदेशी आणण्यासाठी विशेष चार्टड विमानांची व्यवस्था केली आहे. गरज पडल्यास भारतीय नौदलाच्या युद्धनौकांचा सुद्धा वापर केला जाईल.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर काय म्हणाले?

“ज्यांना मायदेशी परतायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी आम्ही ऑपरेशन अजय सुरु करत आहोत. विशेष चार्टड विमान आणि अन्य व्यवस्था करण्यात येईल” अशी माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी एक्सवरुन दिली. परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं जयशंकर यांनी म्हटलं आहे. स्पेशल फ्लाइटसाठी नोंदणी करणाऱ्या भारतीय नागरिकांची यादी ई-मेल केली आहे असं तेल अवीवमधील भारतीय दूतावासाकडून सांगण्यात आलं.