नवी दिल्ली : G-20 शिखर परिषदेत यशस्वीपणे पार पडली आहे. जी -२० परिषदेत सहभागी होण्यासाठी अनेक देशाचे प्रमुख आले होते. ज्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, जपानचे पंतप्रधान, बांग्लादेशच्या पंतप्रधान, फ्रान्सचे अध्यक्ष, ब्रिटनचे पंतप्रधानांसह जवळपास २९ देशांचे प्रमुख उपस्थित होते. पण भारतात आलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांना भारतात राहावे लागले आहे. कॅनेडियन इंग्रजी वृत्तपत्र CTV नुसार, एक बॅकअप विमान पीएम ट्रुडो आणि भारतात अडकलेल्या कॅनडाच्या शिष्टमंडळाला घेण्यासाठी येत असल्याची माहिती पुढे आली आहे.
पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि कॅनडाच्या G-20 शिष्टमंडळाला घेण्यासाठी कॅनडावरुन पोलारिस विमान भारतात येण्यासाठी निघाले आहे. कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयाने अशी माहिती दिली आहे की, जस्टिन ट्रूडो आणि शिष्टमंडळाला परत आणण्यासाठी एक बॅकअप एअरबस CFC002 ट्रेंटनहून भारताकडे रवाना झाले आहे. हे एअरबस विमान रविवारी स्थानिक वेळेनुसार रात्री 8 वाजता सीएफबी ट्रेंटनहून निघाले. सोमवारी सकाळी इंग्लंडमध्ये थांबले. सध्या Airbus CFC002 भारतात येण्यासाठी निघाले आहे.
रविवारी संध्याकाळीच टुड्रो यांनी पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय बैठक घेतली होती. जस्टिन ट्रूडो 8 सप्टेंबर रोजी G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी दिल्लीत पोहोचले. रविवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. कॅनडातील खलिस्तानी अतिरेक्याचा मुद्दा या बैठकीतील प्रमुख विषयांपैकी एक होता.
द्विपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत-कॅनडा संबंध सामायिक लोकशाही मूल्ये, कायद्याच्या राज्याचा आदर आणि लोक-जनतेतील मजबूत संबंधांवर आधारित आहेत.
पंतप्रधान मोदींनी कॅनडातील अतिरेकी घटकांच्या भारतविरोधी कारवायांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, हे घटक फुटीरतावादाला प्रोत्साहन देत आहेत, भारतीय मुत्सद्द्यांविरुद्ध हिंसाचार भडकावत आहेत, राजनैतिक परिसराचे नुकसान करत आहेत आणि कॅनडातील भारतीय समुदाय आणि त्यांच्या प्रार्थनास्थळांना धोक्यात आणलं जात आहे.