दुबई : संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये मंगळवारी विक्रमी पाऊस झाला. त्यामुळे देशाच्या सर्व भागांना पुराचा सामना करावा लागला आहे. जगभरात यूएईची ओळख असलेल्या दुबईचे चित्र पाहून जगातील लोकांना विश्वास बसत नव्हता. महापुराचे दृश्य सगळीकडे दिसत होते. अतिवृष्टीनंतर देशाचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद यांनी देशातील पायाभूत सुविधांचा अभ्यास करण्याचे आदेश दिले आहेत. 18 एप्रिल रोजी जारी केलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले की, देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आहे. शेख झायेद यांनी अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या सर्व कुटुंबांना मदत देण्याचे आणि बाधितांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश दिले.
UAE चे पंतप्रधान आणि दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी देखील एक निवेदन जारी केले आहे, ज्यामध्ये त्यांनी सर्व लोकांच्या सुरक्षिततेबद्दल देवाचे आभार मानले आहेत. राष्ट्रपतींच्या देखरेखीखाली आणि नेतृत्वाखाली देश चांगल्या आणि सुरक्षित परिस्थितीत असल्याचे ते म्हणाले. रशीद अल मकतूम हे UAE चे उपाध्यक्ष देखील आहेत. त्यांनी नागरिक आणि रहिवाशांच्या टीमच्या मदत कार्याची प्रशंसा केली.
मकतूम म्हणाले की, “संकटाच्या वेळी देश आणि समाजांची ताकद ओळखली जाते. आम्ही ज्या नैसर्गिक संकटाचा सामना केला त्यामुळं देशाच्या कानाकोपऱ्यातील सर्व नागरिक आणि रहिवाशांनी काळजी आणि एकता याद्वारे एकमेकांवर अतूट प्रेम दाखवले.” सोमवारी रात्री UAE आणि आसपासच्या वाळवंटात पाऊस सुरू झाला, जो मंगळवारी संध्याकाळपर्यंत सुरू होता. या काळात UAE मध्ये पावसाने 75 वर्षांचा विक्रम मोडला. दीड वर्षातील सरासरीइतका पाऊस काही तासांतच झाला.
दुबईमध्ये सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. देशातील सर्वात स्मार्ट शहर दुबई पूर्णपणे पाण्याखाली गेले. विमानतळापासून ते मेट्रो स्टेशन, मॉल्स, रस्ते, सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेले दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करावे लागले. पावसामुळे धावपट्टीवर पाणी गेल्याने अनेक येणारी उड्डाणे शेवटच्या क्षणी वळवावी लागली. शेजारील ओमानमध्येही पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. ओमानमध्ये पुरामुळे २० जणांचा मृत्यू झाला आहे.