भारत-बांगलादेश सीमेवर हाय अलर्ट, BSF चे डीजी कोलकात्यात दाखल

| Updated on: Aug 05, 2024 | 4:22 PM

बांगलादेशातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. आतापर्यंत झालेल्या हिंसाचारात 19 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. वाढता हिंसाचार पाहता शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यावर देश सोडण्याची वेळ आली आहे. त्या भारतात दाखल झाल्या आहेत. लष्कराने आता देशाची कमान हाती घेतली आहे.

भारत-बांगलादेश सीमेवर हाय अलर्ट, BSF चे डीजी कोलकात्यात दाखल
Follow us on

PM Sheikh Hasina l बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु झाल्यानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. लष्करप्रमुख वकार-उझ-जमान यांनी हसीना यांना ४५ मिनिटांत राजीनामा देण्याचे अल्टिमेटम दिले होते. पंतप्रधान शेख हसीना देश सोडून भारतात आल्याची माहिती आहे. आंदोलकांनी शेख हसीना यांच्या घरात घुसून तोडफोड केली आहे. शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर देशातील अनेक भागात विजयोत्सव साजरा केला जात आहे. पण याआधी हिंसाचारात 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. शेख हसीना यांच्यासोबत त्यांची बहिणीने देखील ढाका सोडले आहे. बांगलादेशच्या लष्करप्रमुखांनी हसीना यांच्याकडे सन्मानपूर्वक राजीनामा देण्याची मागणी केली होती.  बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या मुलाने सुरक्षा दलांना कोणत्याही अनिर्वाचित सरकारला सत्तेवर येण्यापासून रोखण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर लष्करप्रमुख राष्ट्राला संबोधित करणार आहेत.

बांगलादेशमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर बीएसएफने भारत-बांगलादेश सीमेवर हाय अलर्ट जारी केला आहे. बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बीएसएफचे डीजीही कोलकाता येथे पोहोचले आहेत.

आंदोलन झाले तीव्र

पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी रविवारी सुरू झालेले आंदोलन हिंसाचारात परिवर्तीत झाले. ज्यामुळे 300 हून अधिक लोकांनी जीव गमवावा लागलाय. कोट्यवधींच्या सरकारी मालमत्तेचं नुकसान झाले आहे. लोकांनी अनेक ठिकाणी जाळपोळ केली आहे. आदोलकांनी राजधानी ढाका ताब्यात घेतली आहे. रस्त्यावर लाखो लोकं आंदोलन करत आहेत. देशातील अवामी लीग सरकार आणि पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर टीका होऊ लागली आहे.

लष्करप्रमुखांनी राजकारण्यांशी संवाद

बांगलादेशच्या मीडियानुसार, देशाचे लष्कर प्रमुख सध्या देशातील परिस्थितीवर राजकीय पक्षांच्या नेतृत्वाशी सल्लामसलत करत आहेत. यानंतर लष्करप्रमुख देशाला संबोधित करणार आहेत. बांगलादेशच्या लष्करप्रमुखांचे पुन्हा एकदा काही काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. लष्करप्रमुख आपल्या भाषणात सत्ताबदलाची घोषणा करतील, असे मानले जात आहे.

पोलीस -विद्यार्थ्यांमध्ये झडप

गेल्या महिन्यात, बांगलादेशातील वादग्रस्त कोटा प्रणालीवरून ढाका विद्यापीठातील विद्यार्थ्यांची पोलीस आणि सरकार समर्थक निदर्शकांशी हिंसक झटापट झाली होती. त्यानंतर देशात आंदोलन वाढू लागलं. नंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू झाला. सुप्रीम कोर्टाने कोटा कमी करण्याचा निर्णय घेतल्यावर आंदोलन कमी होईल अशी अपेक्षा होती. पण रविवारी लाखो लोकं हसीनाच्या राजीनाम्याची मागणी करत रस्त्यावर उतरले आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. लोकांनी शेख हसीना यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शेख हसीना यांना देश सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. विशेष हेलिकॉप्टरने त्या भारतात दाखल झाल्या आहेत. सध्या त्यांनी भारताकडे आश्रय घेतला आहे.