ब्रिटनमध्ये भारतीय वंशाच्या लोकांनी बांगलादेशमधील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवला म्हणून त्यांना दिलेला सन्मान परत घेतला आहे. भारतीय समुदायाच्या य दोन प्रमुख व्यक्तींची पदे काढून घेण्यात आली आहेत. कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे सदस्य रामी रेंजर आणि हिंदू कौन्सिल यूकेचे व्यवस्थापकीय विश्वस्त अनिल भानोत यांना देण्यात आलेला सन्मान मागे घेतला आहे. कोट्याधीश रामी रेंजर यांना CBE (कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर) पदावरून हटवण्यात आले आहे. तर अनिल भानोत यांना OBE (ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर) पदावरून हटवण्यात आले आहे.
या दोन्ही मोठ्या व्यक्तींना बकिंघम पॅलेसमध्ये त्यांना देण्यात आलेले सन्मान चिन्ह परत करण्यास सांगितले आहे. अनिल भानोत यांना सामुदायिक एकता वाढवल्याबद्दल ओबीई हे पद देऊन गौरविण्यात आले होते. त्यांच्याविरुद्ध इस्लामोफोबियाचा आरोप करण्यात आला आहे.
अनिल भानोत यांच्यावर आरोप काय?
अनिल भानोत म्हणाले की, 2021 मध्ये त्यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचाराबद्दल सोशल मीडिया हँडल X वर पोस्ट केली होती. या पोस्ट्सवरुन त्यांच्यावर इस्लामोफोबियाचा आरोप करण्यात आला आहे. ते म्हणाले की इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स आणि धर्मादाय आयोगाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कारणास्तव या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली असली तरी, जप्ती समितीला कोणी सूचित केले होते हे त्यांना माहित नाही.
रामी रेंजर यांच्यावर काय आरोप?
रामी रेंजरच्या विरोधात तक्रार आहे की, जेव्हा बीबीसीचा “इंडिया: द मोदी क्वेशन” हा माहितीपट प्रकाशित झाला तेव्हा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बचावात उतरून माहितीपटावर टीका केली होती. अमेरिकास्थित शिख फॉर जस्टिस या समूहाबाबतही त्यांच्यावर आरोप आहे, ज्यावर भारतात बंदी आहे.
अनिल भानोत तक्रारींबाबत काय म्हणाले?
अनिल भानोत यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत म्हणाले की, जेव्हा बांगलादेशात मंदिरे पाडली गेली आणि हिंदूंवर हल्ले झाले, तेव्हा बीबीसीने ते कव्हर केले नाही आणि मला वाटले की कोणीतरी त्याविरोधात आवाज उठवावा. मी काहीही चुकीचे केलेले नाही आणि मी सन्मान व्यवस्थेचा अवमान केला नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य इंग्लंडमध्ये इतिहासजमा आहे. याबद्दल मी दु:खी आहे.
रामी रेंजर कायदेशीर कारवाई करणार
रामी रेंजर यांना 2016 मध्ये CBE चा सन्मान प्रदान करण्यात आला होता. ब्रिटिश बिझनेस आणि कम्युनिटी सर्व्हिससाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला होता. हा सन्मान काढून घेतल्यानंतर ते म्हणाले, मला सीबीई पदाची चिंता नाही, परंतु मला असे वाटते की भाषण स्वातंत्र्यावर गदा आणली गेली आहे. ते चुकीच्या लोकांचा सन्मान करत आहेत. या प्रकरणात आपण कायद्याची मदत घेणार आहोत. हे प्रकरण युरोपियन मानवाधिकार न्यायालयात नेण्याचा विचार करत आहेत.