अमेरिकेत पुढील महिन्यात निवडणुका होणार आहेत. त्यामुळे नव्या वर्षात अमेरिकेला नवा राष्ट्राध्यक्ष मिळणार आहे. यंदा निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात टक्कर आहे. त्यामुळे दोघांपैकी एक जण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे पद जगातील सर्वात शक्तिशाली पद मानले जाते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांना अनेक सुविधा मिळतात. राष्ट्राध्यक्ष हे फेडरल कर्मचारी असतात. ज्यांना पगार देखील मिळतो. मात्र, हा पगार अमेरिकेच्या सरासरी उत्पन्नापेक्षा खूप जास्त आहे. एक अमेरिकन दर वर्षी सरासरी $44,500 (रु. 37.41 लाख) कमवतो.
फर्स्टपोस्टच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना पद सोडल्यानंतर भत्ते, प्रवास आणि मनोरंजन भत्ता आणि पेन्शन मिळते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना वर्षाला $400,000 पगार म्हणून मिळतो. याशिवाय त्यांना दरवर्षी $50,000 (रु. 42 लाख) खर्च भत्ता, $100,000 (रु. 84 लाख) नॉन-करपात्र प्रवास खाते आणि $19,000 (रु. 16 लाख) मनोरंजन भत्ता मिळतो. एकूणच, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या सर्व खर्चासाठी एका वर्षात $569,000 (रु. 4.78 कोटी) मिळतात. यूएस कायद्यानुसार, भत्त्यातील न वापरलेली रक्कम कोषागारात परत करावी लागते. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना वार्षिक $400,000 (रु. 3.36 कोटी) पगार दिला जातो.
जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी, 2001 मध्ये अमेरिकन काँग्रेसने अमेरिकेच्या अध्यक्षांच्या वार्षिक पगारात शेवटची वाढ केली होती. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ज्या कालावधीसाठी निवडून आले आहेत त्या कालावधीसाठी त्यांचे उत्पन्न बदलता येत नाही. पगाराव्यतिरिक्त अध्यक्षांना बऱ्याच सुविधा मिळतात. ज्याणध्ये प्रेसिडेन्शिअल लिमोझिन, द बीस्ट, मरीन वन आणि एअर फोर्स वनमध्ये मोफत प्रवास आणि व्हाईट हाऊसमध्ये मोफत निवासस्थान मिळते. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना आणखी एक फायदा म्हणजे त्यांना $200,000 (रु. 1.68 कोटी) वार्षिक पेन्शन, आरोग्यसेवा कव्हरेज आणि सशुल्क अधिकृत प्रवास भत्ता देखील मिळतो.
पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे जगातील सर्वाधिक पगार घेणारा नेते नाहीयेत. सध्या जगातील सर्वाधिक पगार घेणारे नेते सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग आहेत. वोंग यांचा वार्षिक पगार सुमारे $1.69 दशलक्ष (रु. 14.20 कोटी) आहे. जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या राजकारण्यांच्या यादीत हाँगकाँगचे जॉन ली का-चिऊ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांना वार्षिक $672,000 (रु. 5.64 कोटी) मानधन मिळते.
अमेरिकेच्या अध्यक्षांना त्यांचे वेतन नाकारण्याची परवानगी नाही, परंतु ते त्यांना मिळणारा पगार एखाद्या संस्थेला दान करू शकतात. जॉर्ज वॉशिंग्टन यांनी सुरुवातीला वेतन घेण्यास नकार दिला होता. पण नंतर काँग्रेसने त्यांना तसे करण्यापासून रोखले होते. यानंतर काही राष्ट्राध्यक्षांनी पगार दान केला. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचाही समावेश आहे. ट्रम्प हे 2016 मध्ये राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी आपला पगार दान केला होता.