इस्रायलने शनिवारी इराणवर हवाई हल्ला केला. यात इस्रायलने इराणच्या 10 ठिकाणांना लक्ष्य केलं. इराणने 1 ऑक्टोंबरला इस्रायलवर बॅलेस्टिक मिसाइलने हल्ला केला होता. त्याचा बदला घेण्यासाठी इस्रायलने इराणच्या सैन्य तळांना टार्गेट केलं. इस्रायलने 100 पेक्षा जास्त फायटर जेट्स इराणवर हल्ल्यासाठी पाठवली होती. जेट्समधून बॉम्ब वर्षाव सुरु झाल्यानंतर स्फोटाच्या आवाजाने इराणची राजधानी तेहरान हादरली.
इस्रायलच्या या हल्ल्यामुळे आशिया खंडात युद्धाचा धोका वाढला आहे. पश्चिम आशियात आधीच इस्रायल गाजामध्ये इराण समर्थित हमास आणि लेबनानमध्ये हिज्बुल्लाह विरोधात लढाई लढतोय. इस्रायली सैन्याने शनिवारी सांगितलं की, त्यांनी इराणच्या सैन्य तळांवर थेट हल्ले चढवले. इस्रायलच्या दोन अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं की, ‘हल्ल्यात अण्वस्त्र साईट आणि तेल विहिरींना लक्ष्य केलं नाही’
हल्ल्यानंतर इराणने काय माहिती दिली?
तेहरानच्या एका नागरिकाने सांगितलं की, “हल्ल्याच्या पहिल्या लाटेत स्फोटाचे सात आवाज ऐकले. त्यामुळे आस-पासच्या भागात दहशत निर्माण झाली” इराणकडून शनिवारी सकाळी एयरस्पेस बंद करण्यात आला आहे. इस्रायलने हल्ल्यात इलाम, खुजस्तान आणि तेहरान प्रांतातील सैन्य तळांना लक्ष्य केल्याच इराणने शनिवारी सांगितलं. त्याच बरोबर 5 शहरात सुद्धा हल्ले केले. यात फार जास्त नाही पण नुकसान झाल्याच इराणने म्हटलय.
इस्रायलने सैन्य तळांशिवाय अजून कुठे टार्गेट केलं?
हल्ल्यात झालेल्या नुकसानीचा एकही फोटो समोर आलेला नाही. एअर डिफेन्स सिस्टिममुळे हल्ल्यात होणारं नुकसान कमी झालं, असा इराणी सैन्याचा दावा आहे. इराणमधील मिसाइल निर्माण करणारे कारखाने आणि अन्य तळांना लक्ष्य केल्याच इस्रायलने सांगितलं. इराणवर हल्ला करुन सर्व विमानं सुरक्षित परत आल्याच इस्रायलने सांगितलं. इस्र्यालवर हल्ला करण्यासाठी जिथे मिसाइल निर्मिती झाली, त्या कारखान्यांना लक्ष्य केल्याच इस्रायलने सांगितलं. या मिसाइल्समुळे इस्रायली नागरिकांना थेट धोका होता असं इस्रायलकडून सांगण्यात आलं.