कराची | 26 जुलै 2023 : अंजू सध्या पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वाच्या दीर बाला येथे पोहोचली आहे. पाकिस्तानी तरुणाशी फेसबुकवरून मैत्री झाल्यावर तिने त्याच्याशी विवाह करण्यासाठी पाकिस्तान गाठलं आहे. पाकिस्तानात गेल्यावर मात्र तिने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी प्रियकर नसरुल्लाह याच्याशी लग्न करेल. पण इस्लाम कबूल करणार नाही. हिंदू म्हणूनच राहीन, असं ठाम मत तिने व्यक्त केलं आहे. त्यामुळे आता नसरुल्लाह त्यावर काय मत व्यक्त करतो त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
लग्नासाठी इस्लाम कबुल करण्याची माझ्यावर कोणतीही सक्ती नाही. कोणताही दबाव नाही. मात्र, लग्नासाठी धर्म बदलला पाहिजे असं मला वाटत नाही, असं अंजू म्हणाली. यावेळी तिने नसरुल्लाहसोबतच्या भेटीच्या आठवणी सांगितल्या. 2020मध्ये फेसबुकच्या माध्यमातून आम्ही एकमेकांच्या संपर्कात आलो. त्याला भेटण्यासाठी मी पाकिस्तानात आले आहे. इथे आल्यावर मला चांगलं वाटतं. इथले लोक खूप चांगले आहेत, असं ती म्हणाली.
इथे येण्यापूर्वी मी माझ्या नवऱ्याला सांगितलं नव्हतं. सांगितलं असतं तर त्याने मना केलं असतं. पाकिस्तानात मला प्रवेश मिळेल की नाही हे सुद्धा मला माहीत नव्हतं. पाकिस्तानात आल्यावर मी नवऱ्याला इकडे आल्याचं सांगितलं. मी माझ्या मुलांच्याही सातत्याने संपर्कात आहे. साखरपुडा आणि लग्नाबाबत मी माझ्या नवऱ्याला काहीच सांगितलं नाही. मी त्यांच्याशी अधिक बोलत नाही. फक्त मुलांसाठी मी परत येईन असं मी त्यांना सांगितलं. माझा एक महिन्याचा व्हिसा आहे. दोन चार दिवसात मी भारतात जाईल, असं तिने सांगितलं.
मी सर्व काही पाहून निरखून साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व काही चांगलं वाटलं तर निघण्यापूर्वी एक दिवस आधी मी साखरपुडा करून घेईल. त्यानंतर भारतात येईल. नंतर पुढची प्रक्रिया पूर्ण करेल, असंही तिने स्पष्ट केलं. नसरुल्लाह सोबतचे माझे संबंध चांगले आहेत. त्याचे कुटुंबीयही चांगले आहेत. मला प्रेम देतात. माझ्यावर कोणताच दबाव नाही. मी विवाहित आहे. मला दोन मुले आहेत, हे त्यांनाही माहीत आहे, असंही तिने स्पष्ट केलं.