Vladimir Putin | रशिया आणि युक्रेनमध्ये मागच्या दोन वर्षांपासून युद्ध सुरु आहे. अजूनही हे युद्ध थांबलेलं नाहीय. या दरम्यान फ्रान्सच एक चुकीच पाऊल या युद्धाचा भडका आणखी वाढवू शकतं. व्लादिमीर पुतिन यांनी युरोपियन देशांना आधीच इशारा दिला आहे. फ्रान्सचे सैनिक युक्रेनला जाण्यासाठी तयार आहेत. स्वत: फ्रान्सच्या सैन्याचे चीफ ऑफ स्टाफ जनरल पियरे शिल यांनी पुष्टी केली आहे. फ्रान्स आपल्या हिताच्या रक्षणासाठी कठीण काम करण्यास तयार आहे असा पियरे यांचा दावा आहे. फ्रान्स आपले 2 हजार सैनिक युक्रेनला पाठवणार आहे, असा रशियन गुप्तचर यंत्रणेचा दावा आहे. फ्रान्सच्या सैनिकांचा अचानक युक्रेनला जाण्याचा निर्णय अनेक देशांना पचवता येत नाहीय. काही देश या निर्णयाकडे वर्ल्ड वॉर 3 ची सुरुवात म्हणून पाहत आहेत. काही देशांनी अण्वस्त्र युद्धाची शक्यता नाकारलेली नाही.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी आपल्या वार्षिक संबोधनात आधीच इशारा दिला आहे. पाश्चिमात्य देशांनी रशियाच्या संप्रभुतेला आव्हान दिलं, तर परिणाम गंभीर होतील. त्याचवेळी त्यांनी हे सुद्धा स्पष्ट केलं होतं की, नाटोने आपल्या फौजा युक्रेनमध्ये पाठवल्या तर न्यूक्लियर वॉरचा धोका वाढेल. पुतिन एवढ्यावरच थांबले नव्हते. ज्या देशांनी आमच्या देशात सैन्य पाठवलय, त्यांची वाईट अवस्था झाल्याची आठवण करुन दिली. कोणी असं करण्याची हिम्मत केली, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यांना दिला आहे.
धमक्यांना आम्ही घाबरलो, असा अर्थ निघेल
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅनुएल मॅक्रॉन यांनी युक्रेनमध्ये सैन्य पाठवण्याबाबत कधीही इन्कार केला नाही. युक्रेनची मदत कमी केली, तर रशियाच्या धमक्यांना आम्ही घाबरलो, असा अर्थ काढला जाईल असं ते म्हणत आले आहेत. दोन दिवसांपूर्वी फ्रान्सचा पेपर पेरिसियनसोबत बोलताना मॅक्रॉन म्हणाले की, “युक्रेनमधून रशियन सैन्याला पळवण्यासाठी मोठ्या ग्राऊंड ऑपरेशनची आवश्यकता आहे” फ्रान्समध्ये असं करण्याची हिम्मत आहे, असं ते म्हणाले. यानंतर त्यांनी जर्मनी आणि पोलंडच्या नेत्यांची भेट घेतली. आम्ही कधीच रशियाला युक्रेन विरुद्ध जिंकू देणार नाही. कारण आम्ही युक्रेनसोबत आहोत.