कॅनडा आणि भारतामधील राजनैतिक वादामध्ये भारतीय सैन्याच मोठं नुकसान होऊ शकतं. सध्याच्या तणावामुळे कॅनडाकडून स्ट्रायकर चिलखती वाहन खरेदीची योजना गुंडाळून ठेवावी लागू शकते. या स्ट्रायकर वाहनांची कॅनडामध्ये निर्मिती होते. लडाखमध्ये चीनला लागून असलेल्या सीमेवर स्ट्रायकर चिलखती वाहनांची तैनाती करण्याची भारतीय सैन्याची योजना आहे. अमेरिकेकडून आतापर्यंत भारताला अनेकदा स्ट्रायकर चिलखती वाहनांच्या विक्रीचा आणि सह उत्पादनाचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यावर्षी जून महिन्यात स्ट्रायकरवरुन बोलणी प्राथमिक टप्प्यात होती. या वाहनांच्या क्षमतेच प्रदर्शन भारतीय सैन्यासमोर केलं जाणार होतं. पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या भारताने स्ट्रायकर खरेदीचा कोणताही निर्णय घेतलेला नाही.
अमेरिकेकडून स्ट्रायकर वाहनाचा वापर पायदळ सैन्यासाठी लढाऊ वाहन म्हणून केला जातो. मागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात भारत-अमेरिकेमध्ये 2+2 चर्चे दरम्यान अमेरिकेने ‘स्ट्रायकर’च्या सह उत्पादनावर भर दिला होता. अमेरिकेने भारताला याच्या एयर डिफेंस सिस्टम वेरिएंटचा प्रस्ताव दिला होता. त्यामुळे उंचावरील क्षेत्रात या वाहनांची तैनाती करुन शत्रुची विमान पाडता येऊ शकतात. त्यानंतर जून महिन्यात दोन्ही देशांमध्ये चिलखती वाहन खरेदीवरुन चर्चा सुरु झाली. पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यात कोणतीही प्रगती झाली नाही.
कुठली कंपनी ही वाहनं बनवते?
कॅनडाची जनरल डायनामिक्स लँड सिस्टम्स (GDLS-C) कंपनी या चिलखती स्ट्रायकर वाहनांची निर्मिती करते. पण कॅनडा आणि भारतामधील डिप्लोमेटिक तणावामुळे या वाहनाच्या खरेदी संदर्भात बोलणी पुढे सरकलेली नाही. भारताला लडाखमध्ये चीनला लागून असलेल्या सीमेवर या वाहनाची तैनाती करायची होती. भारत-कॅनडामधील बिघडत्या संबंधांमुळे या डीलबद्दल संशय निर्माण झाला आहे.
भारतीय कंपन्यांचा विरोध का?
भारत-अमेरिकेत होणाऱ्या या डीलनुसार मर्यादीत प्रमाणात ही वाहन विकत घेण्याची योजना होती. त्यानंतर भारतात कॅनडाच्या कंपनीसोबत मिळून वाहन निर्मिती करण्याचा प्रस्ताव होता. भारतातील काही संरक्षण साहित्य उत्पादन कंपन्यांनी या डीलला विरोध केला होता. आम्ही अशी चिलखती वाहनं बनवण्यासाठी सक्षम आहोत, असं भारतीय कंपन्यांच म्हणणं आहे.
भारतीय सैन्याकडे WhAP, हे काय आहे?
भारताकडे DRDO आणि टाटा एडवांस्ड सिस्टम लिमिटेडने बनवलेलं WhAP आहे, ज्याचा वापर भारतीय सैन्य लडाखमध्ये करतय. हा व्हील्ड आर्मर्ड प्लॅटफॉर्म आहे, ज्यामुळे भारतीय सैन्याच्या पायदळ तुकडीची ताकद वाढली आहे.