माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार गेल्यानंतर बांगलादेशात सध्या अंतरिम सरकार काम करत आहे. बांगलादेशात हिंदूविरोधात तणावाचे वातावरण आहे. या नव्या सरकारकडून सतत भारतविरोधी वक्तव्य येत आहेत. स्थानिकांचा उद्रेक टाळण्यासाठी ते भारताविरोधात प्रतिक्रिया देत आहेत. पण असं असलं तरी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या पंतप्रधानांना भारताच्या पंतप्रधानांनी भेटण्याची इच्छा आहे. बांगलादेशच्या तिन्ही बाजुंनी तो वेढला आहे. त्यामुळे भारतविरोधी वक्तव्य बांगलादेशला भारी पडू शकतात. हेच कारण आहे की देशात एकीकडे ते भारतविरोधी असल्याचं दाखवून दुसरीकडे भारताच्या पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कारण त्यांना पंतप्रधान मोदींचे मन वळवायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत असताना युनूस यांनी त्यांना भेटण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण ही भेट होऊ शकली नाही. बांगलादेशच्या परराष्ट्र सल्लागारानेच ही माहिती दिली आहे.
ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, बांगलादेशचे परराष्ट्र सल्लागार मोहम्मद तौहीद हुसैन यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, न्यूयॉर्कमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली, परंतु पंतप्रधान मोदी आणि डॉ. युनूस यांची भेट झाली नाही. खरं तर, ज्या दिवशी पंतप्रधान मोदी UN मध्ये भाषण देऊन परतण्यासाठी उड्डाण करत होते, त्याच दिवशी बांगलादेश सरकारचे प्रमुख UN मध्ये पोहोचले होते. अंतरिम सरकारने भारतीय परराष्ट्र मंत्र्यांच्या माध्यमातून भेटण्याचा प्रयत्न केला, पण तसे झाले नाही.
तौहीद हुसैन यांनी सांगितले की, पीएम नरेंद्र मोदी आणि मोहम्मद युनूस यांची पुढील महिन्यात बिमस्टेक शिखर परिषदेदरम्यान भेट होऊ शकते. मात्र, अद्याप कोणतीही औपचारिक माहिती नाही. सध्या आम्ही विविध पातळ्यांवर चर्चेद्वारे एकमेकांच्या देशांच्या परस्पर समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहोत. द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, शेख हसीना यांचे सरकार गेल्यानंतर भारताने बांगलादेशमधील सर्व प्रायोजित प्रकल्पांचे काम थांबवले होते. दोन्ही देशांमधील व्यापार सुरू झाला असला तरी भारताने प्रकल्प थांबवून बांगलादेशला मोठा झटका दिलाय.
बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या अर्थ सल्लागाराने एका चर्चासत्रात आपल्या देशात शक्य तितकी गुंतवणूक करण्याची विनंती भारताला केली होती. ते म्हणाले होते की, सध्या बांगलादेशमध्ये अनेक भारतीय प्रकल्प सुरू आहेत, परंतु हे आमच्यासाठी पुरेसे नाही. आम्हाला भारताकडून आणखी गुंतवणूक हवी आहे.