भारताशी पंगा घेणं मालदीवला पडलं महागात, आता या देशापुढे पसरवले हात

| Updated on: Feb 01, 2024 | 8:11 PM

maldives vs india : भारतासोबत तणाव वाढल्यानंतर मालदीव आता अडचणीत सापडला आहे. भारताकडून मालदीवला सर्वाधिक मदत मिळत होती. पण मालदीवमध्ये सत्तापरिवर्तन झाल्यानंतर तेथील सरकारने भारतविरोधी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता त्यांनाच याचा मोठा फटका बसताना दिसत आहे.

भारताशी पंगा घेणं मालदीवला पडलं महागात, आता या देशापुढे पसरवले हात
Follow us on

India maldive raw : भारतासोबत पंगा घेणे मालदीवसाठी चांगलेच महागात पडले आहे. मालदीवला पर्यटनाच्या बाबतीत मोठे नुकसान झाले आहे. पण आता त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रालाही मोठा धक्का बसला आहे. कारण मालदीवचे लोक उपचारासाठी भारतात येत असत पण भारतासोबतच्या राजनैतिक वादानंतर मालदीवने आता श्रीलंकेकडे मदत मागितली आहे. यासाठी मालदीवचे परिवहन आणि नागरी उड्डाण मंत्री मोहम्मद अमीन यांनी श्रीलंकेचे समकक्ष निमल सिरिपला डी सिल्वा यांची भेट घेतली आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, ‘श्रीलंकेने मालदीवला वैद्यकीय स्थलांतरासाठी मदत करण्यास सहमती दर्शवली आहे.’ याचा अर्थ मालदीवमधील एखाद्याला तातडीच्या उपचारांची गरज भासल्यास त्याला तात्काळ एअरलिफ्ट करून श्रीलंकेत उपचारासाठी आणले जाऊ शकते.

मोहम्मद अमीन यांनी लिहिले की, ‘आम्ही मालदीव आणि श्रीलंका दरम्यानच्या तातडीच्या गरजा, विशेषत: वैद्यकीय निर्वासन उड्डाणे तातडीने मंजूर करण्यासाठी फ्रेमवर्क तयार करण्यास सहमती दर्शवली आहे.’

‘मालदीव या कामासाठी फक्त त्यांच्या एअर ॲम्ब्युलन्सचा वापर करेल. आम्ही या कामात मालदीवला मदत करू, आणीबाणीच्या वैद्यकीय उपचारांसाठी येणाऱ्या लोकांसाठी ही प्रक्रिया सुलभ होईल असे त्यांनी म्हटले आहे.

श्रीलंकेपुढे पसरवले हात

भारत आणि श्रीलंका हे मालदीवचे शेजारील राष्ट्र आहेत. मालदीव आणि श्रीलंकेचे जवळचे संबंध आहेत. याआधी मालदीवचे देखील भारतासोबत चांगले संबंध होते. पण मालदीवमध्ये सरकार बदल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. मालदीवला त्यामुळे श्रीलंकेच्या जवळ येण्यास भाग पाडले आहे.

मालदीव सरकारमधील तीन मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टवर आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर तिन्ही मंत्र्यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली होती. पण त्यानंतर पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनानंतर भारतीय लोकांनी मालदीवला जाण्याचे टाळले आणि लक्षद्वीपला येण्याचा प्लान केला. पर्यंटनाच्याबाबतीत मालदीवला मोठा फटका बसला.

भारतविरोधी वक्तव्य

मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यादरम्यान चीनच्या दौऱ्यावर होते. त्याचा कल भारतापेक्षा चीनकडे अधिक होता. सरकारमध्ये येण्याआधी त्यांनी भारत विरोधी वक्तव्य देखील केले होते. पण भारताने नेहमीच मालदीवला मदत केली आहे. मालदीवमधील बरेच लोक स्वस्त आणि चांगल्या उपचारांसाठी भारतात येत असतात. पण आता तणावादरम्यान या सेवेला फटका बसला आहे. मालदीवमध्ये अनेक गंभीर आजारांवर योग्य उपचार उपलब्ध नसल्याने ते भारतावर अवलंबून आहेत.

भारताने मालदीवला दोन नौदलाचे हेलिकॉप्टर आणि एक डॉर्नियर विमान दिले आहे. ज्याचे दुरुस्ती करण्यासाठी आणि देखभालीसाठी काही भारतीय जवान मालदीवमध्ये तैनात आहेत. त्यांना परत माघारी बोलवण्याचे आदेश मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी काढले होते. यासाठी १५ मार्चची डेडलाईन देण्यात आली होती.