पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या ऑस्ट्रिया दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ऑस्ट्रियाचे चांसलर कार्ल नेहॅमर यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, भारत हा एक प्रभावशाली आणि विश्वासार्ह देश आहे. रशिया-युक्रेन शांतता प्रक्रियेत भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांनी तटस्थ राहून चर्चा करण्याचं आवाहन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या औपचारिक चर्चेनंतर त्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत नेहमर यांनी ही प्रतिक्रिया दिली. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाबाबत पंतप्रधान मोदींशी चर्चा केल्याचे नेहमर यांनी म्हटले आहे. मॉस्कोमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा झाल्यानंतर मोदी ऑस्ट्रियामध्ये पोहोचले आहेत.
“आम्ही युक्रेन विरुद्ध रशिया युद्धावर तपशीलवार संभाषण केले,” चान्सलर नेहॅमर म्हणाले की. ऑस्ट्रियाचा फेडरल चांसलर म्हणून, भारताचे आकलन जाणून घेणे आणि भारताची युरोपीय समस्यांशी ओळख करून देणे हे माझ्यासाठी विशेष महत्वाचे आहे. याशिवाय पश्चिम आशियातील संघर्ष हा प्रमुख विषय होता, असे नेहमर म्हणाले. मोदींनी ऑस्ट्रिया दौऱ्यापूर्वी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट घेतली होती. “त्यामुळे शांतता चर्चेबाबत रशियाच्या हेतूंचे पंतप्रधानांचे वैयक्तिक मूल्यांकन ऐकणे विशेषतः महत्वाचे होते.” असे ही ते म्हणाले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रियाला जाण्यापूर्वी 22 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी दोन दिवस रशियात होते. पुतीन यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींनी त्यांना सांगितले की युक्रेन संघर्षाचे निराकरण युद्धभूमीवर शक्य नाही आणि बॉम्ब आणि गोळ्यांमध्ये शांततेचे प्रयत्न यशस्वी होत नाहीत. संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरनुसार सर्वसमावेशक, न्याय्य आणि चिरस्थायी शांतता प्राप्त करणे हे आमचे समान उद्दिष्ट आहे.”
रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या दोन वर्षापासून युद्ध सुरु आहे. या युद्धाते हजारो लोकांचा जीव गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांततेसाठी चर्चेतून मार्ग काढण्याचं आवाहन दोन्ही देशांना केले होते. आजही ते याच भूमिकेवर ठाम आहेत.
‘युद्ध असो, संघर्ष असो की दहशतवादी हल्ले, माणसांचे प्राण गेले तर मानवतेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दुःख होते. निष्पाप मुले मारली जात असली तरी जेव्हा आपण निष्पाप मुले मरताना पाहतो तेव्हा ते हृदय पिळवटून टाकणारे आणि वेदनादायक असते. रशियाच्या भूमीवरुन पंतप्रधान मोदी यांनी हे वक्तव्य केले आहे.