Rashid Latif : पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाइंड शाहिद लतिफ याची हत्या; पाकिस्तानातच गेम

| Updated on: Oct 11, 2023 | 11:54 AM

भारताच्या आणखी एका शत्रूची हत्या झाली आहे. पाकिस्तानातच त्याला अज्ञातांनी गोळ्या घालून ठार केलं आहे. तो भारताचा मोस्ट वाँटेड आरोपी होता. तसेच पठानकोट हल्ल्याचा मास्टरमाइंडही होता. त्यामुळे जैश ए मोहम्मदला मोठा झटका बसला आहे.

Rashid Latif : पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाइंड शाहिद लतिफ याची हत्या; पाकिस्तानातच गेम
Rashid Latif killed
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कराची | 11 ऑक्टोबर 2023 : भारताचा मोस्ट वाँटेड अतिरेकी शाहिद लतिफ यांची हत्या करण्यात आली आहे. पाकिस्तानातील सियालकोटमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी शाहिद लतिफवर गोळ्या झाडल्या. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. एनआयएने शाहिदच्या विरोधात यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तो पठानकोट हल्ल्याचा मास्टरमाइंड होता. भारताच्या मोस्ट वाँटेड अतिरेक्यांच्या यादीत त्याचा समावेश होता.

शाहिद लतिफ हा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गुजरांवाला येथील रहिवाशी होता. तो जैश ए मोहम्मद या अतिरेक्यांच्या संघटनेत होता. या अतिरेकी संघटनेचा तो सियालकोटचा कमांडर होता. भारतात अतिरेक्यांना पाठवण्यावर देखरेख करणं आणि दहशतवादी हल्ल्याची योजना आखण्यामध्ये तो सामील असायचा. शाहिदला 12 नोव्हेंबर 1994 रोजी अटक करण्यात आली होती. भारतातील तुरुंगात 16 वर्षाची शिक्षा भोगल्यानंतर त्याला 2010 नंतर वाघा बॉर्डरवरून निर्वासित करण्यात आलं होतं.

पठानकोट हल्ल्याचा मास्टरमाइंड

पंजाबच्या पठानकोटमध्ये 2 जानेवारी 2016मध्ये हल्ला झाला होता. त्यामागचा मास्टरमाइंड शाहिदच होता. त्याशिवाय इंडियन एअरलाइन्सचं विमान हायजॅक करण्यातही तो सामील होता. पठानकोटच्या एअरबसवर 2016मध्ये हल्ला करण्यात आला होता. जैश ए मोहम्मदने हा हल्ला घडवून आणला होता. या हल्ल्यात सात भारतीय जवान शहीद झाले होते.

पठानकोट एअरफोर्स आपल्या सीमेजवळ आहे. या ठिकाणी भारताचे शस्त्रास्त्र असतात. युद्धाच्या काळात याच ठिकाणाहून संपूर्ण रणनीती ठरवली जाते. 1965 आणि 1971च्या युद्धात या एअर फोर्स स्टेशनने मोठी भूमिका बजावली होती. मिग-21 फायटेर जेटसाठी हे बेस स्टेशन आहे. शाहिद लतिफच्या आधीही पाकिस्तानात अनेक अतिरेक्यांची हत्या झालेली आहे.

बशीरचीही हत्या

या आधी जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील बशीर अहमद पीर ऊर्फ इम्तियाज आलम यांची पाकिस्तानात अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली होती. बशीरला गोळ्या घालण्यात आल्या होत्या. रावळपिंडीत हा गोळीबार झाला होता. त्याला केंद्र सरकारने दहशतवादी घोषित केलं होतं. रावळपिंडीत बसून तो काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या अतिरेक्यांना रसद पुरवण्याचं काम करत होता. अतिरेक्यांसाठी हा मोठा झटका मानला जात होता. त्यानंतर अतिरेक्यांना दुसरा झटका बसला आहे.