लेबनॉनमधील इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अली खमेनी यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. खमेनी यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता माध्यमांनी व्यक्त केली आहे. त्यानंतर इराणच्या सैन्याने सर्वोच्च नेत्याला सुरक्षित स्थळी हलवले आहे. आता इस्रायलवर एकाचवेळी मोठा हल्ला करण्याची तयारी सुरू असल्याचा दावाही काही वृत्तांत करण्यात आला आहे. इराणचे IRGC क्षेपणास्त्र दल कधीही इस्रायलवर हल्ला करु शकतो असा दावा इराणच्या राज्य माध्यमांनी केला आहे. याशिवाय इराणच्या हवाई दलालाही हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. लढाऊ विमाने पूर्णपणे तयार ठेवण्यात आली आहेत. याशिवाय हवाई संरक्षण यंत्रणाही अलर्टवर आहे.
बेरूतमधील इराणच्या दूतावासाचे म्हटले की, इस्रायलचा हा हल्ला गेम चेंजर ठरू शकतो. या हल्ल्याला गुन्हा ठरवला पाहिजे आणि इस्रायलवर कारवाई केली पाहिजे. इराणच्या दूतावासाने केलेल्याय या वक्तव्यानंतर इराण शांत बसणार नसल्याचा दावा केला जात आहे. लेबनॉनचे कार्यवाहक पंतप्रधान नजीब मिकाती यांनी म्हटले आहे की, इस्रायलच्या या हल्ल्यांवरून असे दिसून येते की, तो युद्धविराम आणण्याच्या प्रयत्नांची पर्वा करत नाही.
इस्रायलने हिजबुल्लाच्या मुख्यालयाला लक्ष्य केल्यानंतर इस्रायली लष्कराने दक्षिण बेरूतमधील काही भाग रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. इस्रायलने तातडीने इमारती रिकामी करण्याचा इशारा दिला आहे. इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी वक्तव्य केले आहे की, लेबनॉनमधील हल्ल्यानंतर इस्रायलची क्रूरता पुन्हा एकदा समोर आली आहे. इस्रायलला हे समजले नाही की स्त्रिया आणि मुलांना मारल्याने प्रतिकारावर काहीही परिणाम होणार नाही. या भागातील संपूर्ण प्रतिकार आघाडी हिजबुल्लाच्या पाठीशी उभी आहे. शेवटी, हिजबुल्ला जिंकेल.
शुक्रवारी लेबनॉनमध्ये इस्रायलने केलेल्या हल्ल्यात हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाह यांच्यासह इराणचा एक वरिष्ठ लष्करी अधिकारीही मारला गेलाय. इराणच्या प्रसारमाध्यमांनी शनिवारी सांगितले की, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे उप कमांडर अब्बास निलफोरोशन हे देखील बेरूतमध्ये इस्रायली हल्ल्यात मारले गेले आहेत. ते ब्रिगेडियर जनरल होते, लेबनॉनमधील कुड्स फोर्सचे ते कमांडर होते.
इस्रायलच्या लष्कराने राजधानी बेरूतमधील हिजबुल्लाच्या मुख्यालयावर जवळपास 80 टन स्फोटकांनी हल्ला केला होता. यामुळे हा इतका मोठा स्फोट झाला. या हल्ल्यात सहा इमारती जमीनदोस्त झाल्या. नसरल्लाह आपल्या मुलीसह येथे उपस्थित होते. इराणी कमांडर्ससह अनेक वरिष्ठ अधिकारीही त्यांच्यासोबत होते. लेबनॉनवरील या हल्ल्यामुळे पश्चिम आशियातील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे.