iran president helicopter crash: इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा रविवारी अपघात झाला. त्यानंतर त्यांचे हेलिकॉप्टर आपत्कालीन परिस्थितीत उतरवण्यात आले. इराणच्या सरकारी टेलिव्हिजनने ही माहिती दिली. राष्ट्रपती इब्राहिम रायसी इराणच्या पूर्व अझरबैजान प्रांतात जात होते. धुके आणि खराब हवामानामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. त्यांच्या हेलिकॉप्टरच्या ‘हार्ड लँडिंग’नंतर बचाव पथकाला घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. शोध पथकाला हेलिकॉप्टर सापडले आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इब्राहिम रायसी व्यतिरिक्त परराष्ट्र मंत्री होसेन अमीराबडोल्लाहियन हे देखील या हेलिकॉप्टरमध्ये होते. दरम्यान, अपघातानंतरच 40 वेगवेगळ्या बचाव पथकांना डोंगराळ भागात पाठवण्यात आले. खराब हवामानामुळे केवळ जमीन मार्गानेच बचाव पथक या भागात पोहोचू शकले आहेत. त्या ठिकाणी हेलिकॉप्टरने पोहोचणे शक्य नाही. परिसरात पक्के रस्ते नाही. तसेच सतत होणाऱ्या पावसामुळे जमीन चिखल झाला आहे. दरम्यान या घटनेत हेलिकॉप्टर पाहिल्यानंतर इब्राहीम रायसी जिवंत असण्याची शक्यता खूप कमी असल्याचे सांगितले जात आहे.
रायसी यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री होसेन अमीराब्दुल्लाहियान, इराणच्या पूर्व अझरबैजान प्रांताचे गव्हर्नर आणि इतर अधिकारी होते. तेहरान टाईम्सच्या मते, इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यात तीन हेलिकॉप्टरचा समावेश होता, त्यापैकी दोन सुरक्षितपणे पोहोचले. परंतु एकाचा अपघात झाला. इराणची राजधानी तेहरानच्या वायव्येस सुमारे 600 किलोमीटर (375 मैल) अंतरावर अझरबैजान देशाच्या सीमेवरील जोल्फा या शहराजवळ ही घटना घडल्याचे स्टेट टीव्हीने म्हटले आहे.
आयआरएनए किंवा सरकारी टीव्हीने रायसी यांच्याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. सरकारी टीव्हीने सांगितले की, बचाव कर्मचारी घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि धुके असल्यामुळे अडचणी येत आहे. अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलीयेव यांच्यासमवेत धरणाचे उद्घाटन करण्यासाठी रायसी रविवारी पहाटे अझरबैजानमध्ये होते. आरस नदीवर दोन्ही देशांनी बांधलेले हे तिसरे धरण आहे.
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्यानंतर तुर्कीनेही मदतीचा हात पुढे केला आहे. तुर्कीने इराणला नाईट व्हिजन सर्च हेलिकॉप्टर पाठवले आहे. यासोबतच इराणने 32 बचाव कर्मचारी आणि बचाव पथकाची 6 वाहने पाठवली आहेत. इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टरच्या अपघातानंतर इराणला ‘सर्व मदत’ देण्यास तयार असल्याचे कतारनेही म्हटले आहे. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. त्याचवेळी, इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टरमधील दोन प्रवाशांशी संपर्क झाल्याचे इराणच्या मीडियाच्या वृत्तात म्हटले आहे.