जगात पुन्हा एकदा युद्धाला सुरुवात झाली आहे. मात्र, यावेळचं युद्ध अत्यंत भयानक असेल अशी चिन्हं दिसत आहेत. इराण आणि इस्रायलच्या दरम्यान प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. हा तणाव इतका टोकाला गेला आहे की, इराणने आज इस्रायलवर ड्रोन हल्ला केला आहे. इराणने इस्रायलच्या दिशेने 100 हून अधिक ड्रोनचा हल्ला केला आहे. त्यामुळे आयडीएफने एअरस्पेस बंद केलं आहे. तर जॉर्डनमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. इराणच्या या हल्ल्यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे.
इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलच्या डिफेन्स फोर्सने हायअॅलर्ट जारी केला आहे. तसेच डिफेन्स फोर्स सातत्याने परिस्थितीवर नजर ठेवून आहे. इस्रायली एअरफोर्स फायटर जेट आणि इस्रायली नौदलाच्या जहाजांसोबतच आयडीएफने एरिअल डिफेन्स एरेलाही हायअलर्टवर ठेवलं आहे. इस्रायलचे नौदल आणि हवाई दल डोळ्यात तेल घालून निगराणी करत आहेत. तर दुसरीकडे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यन्याहू यांनी तेल अवीवच्या किरयामध्ये वॉर कॅबिनेडची मिटिंग बोलावली आहे.
तर, इराण आणि इस्रायलच्या दरम्यान होणाऱ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकी राष्ट्रपती जो बायडेन यांनी नॅशनल सिक्युरिटी टीमच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये मिटिंग बोलावली आहे. इस्रायलवर ड्रोन हल्ला केल्यानंतर इराणचे नेते खामेनेई यांनी ट्विटरवरून एक व्हिडीओ जारी केला आहे. दुष्ट शासनाला शिक्षा केलीच जाईल, असं खेमेनई यांनी म्हटलं आहे.
इराणच्या भूमीतून आमच्यावर थेट हल्ला करण्यात आला आहे. आम्ही इराणने पाठवलेल्या ड्रोनवर नजर ठेवून आहोत. ही गंभीरच नव्हे तर खतरनाक परिस्थिती आहे. इराणकडून करण्यात आलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही आमचं संरक्षण करण्यासाठी हाय अलर्टवर आहोत. हे एक मिशन असून आम्ही पूर्णपणे हे मिशन यशस्वी करू, असं आयडीएफचे प्रवक्ते डॅनियल हागारी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, युद्धाच्या पार्श्वभूमीवर जॉर्डन आणि लेबनानने अनिश्चित काळासाठी विमानतळ बंद केले आहेत. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांचं उड्डाण थांबवण्यात आलं आहे. डझनभर ड्रोन इस्रायलच्या दिशेने जाताना पाहिले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ही दोन्ही विमानतळे बंद ठेवण्यात आली आहे. आम्ही इराणचे विमान किंवा ड्रोन पाडण्यासाठी सज्ज आहोत. त्यासाठी लष्कराला हाय अलर्टवर ठेवण्यात आलं आहे. रडार सिस्टीम ड्रोनच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहे, असं इस्रायलकडून सांगण्यात आलं आहे. तर जॉर्डनने आणीबाणी जाहीर केली आहे.