नवी दिल्ली – पाकिस्तानात सत्तांतर झाल्यापासून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे सातत्याने चर्चेत आहेत. सध्या जागतिक पातळीवर ते पाकिस्तानच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत. आता त्यांच्या हत्येची अफवा पसरल्याची बातमी समोर आल्याने, त्यांच्याबाबतची सहानभूती जागतिक पातळीवर वाढली आहे. इम्रान यांच्या सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. इम्रान यांच्या हत्येचा कट रचण्यात येतो आहे, अशी ओरड वारंवार करण्यात येते आहे. स्वता इम्रान खानही या स्वरुपाचे आरोप करण्यात सहभागी आहेत. यापूर्वीही वादग्रस्त वक्तव्ये आणि प्रकरणांनी इम्रान खान यांचे आयुष्य भरलेले आहेत. त्यांच्या हत्येच्या अफवेनंतर इस्लामाबाद पोलिसांचं मात्र टेन्शन वाढलंय. इम्रान यांच्या हत्येची अफवाच आहे की त्यामागे सत्तेचं राजकारण आहे, हे जाणून घेऊयात
सत्तेतून पायउतार झाल्यानंतर माजी पंतप्रधान इम्रान खान सातत्याने चर्चेत आहेत. कधी त्यांच्या वादग्रस्त व्हिडिओमुळे, तर कधी समलैंगिक संबंधांच्या आरोपांमुळे. ते सातत्याने शहाबाज सरकारवर टीका करताना दिसतायेत. एकीकडे ते भारत पाकिस्तानचे तीन तुकडे करेल असे सांगतायेत तर दुसरीकडे ते भारताचं इंधनाचे दर कमी केले म्हणून कौतुकही करतायेत. चर्चेत आणि मीडियात यानिमित्तानं त्यांना स्पेस मिळते आहे. सध्या पाकिस्तानात विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नाहीत. त्यामुळे राजकारणात सतत चर्चेत कसे राहायचे, याचे गमक इम्रान यांना सापडलेले आहे. ते सातत्याने शहबाज सरकारच्या विरोधात वक्तव्ये करुन चर्चेत, बातम्यांत राहतायेत. याचा परिणाम सरकावरही होतोय. त्यामुळेच त्यांच्या वक्तव्यावर आक्रमक कमी आणि बचावात्मक पवित्रा सरकारकडून घेण्यात येतोय. त्यामुळे इम्रान खान यांची हिंमत वाढते आहे.
इम्रान खान आणि त्यांच्या राजकीय पक्षाला अशी भीती वाटते आहे की, नवे सरकार त्यांची सुरक्षा काढून घेईल. त्यामुळेच अशा हत्येच्या अफवांना पक्षातून बळ देऊन इम्रान यांचे राजकीय महत्त्व अधिक वाढवण्याचा आणि सरकारवर दबाव निर्माण करण्याचा हा प्रयत्नही असू शकतो. सत्तेतील नवे शहबाज सरकार बदल्याची कारवाई म्हणून इम्रान यांची सुरक्षा हटवण्याचा निर्णय घएऊ शकते, अशी शक्यता आहे. अशा स्थितीत सुरक्षा कायम ठेवण्याचे हे राजकारण असल्याचे राजकीय जाणकरांचे मत आहे. हत्येच्या अफवांच्या बातम्यांतून इम्रान खान यांना पाकिस्तानातील जनतेची सहानभूती मिळवायची आहे. यानिमित्ताने इम्रान यांची सुरक्षा कमी होऊ नये, यासाठी त्यांचे समर्थक सरकारवर दबाव निर्माण करण्याच्याही प्रयत्नात आहेत. इम्रान खान यांनीही सत्तेत आल्यानंतर अनेक नेत्यांची सुरक्षा परत घेतली होती. अशा स्थितीत नवे सरकारही हेच करु शकते, त्याआधीच ही अफवा पसरवण्यात आली असावी.
इम्रान खान आणि त्यांचा पक्ष तहरिक ए इन्साफ या दोघांनाही आता सध्या पाकिस्तानात निवडणुका होईपर्यंत सक्रिय राजकारणात टिकून राहायचे आहे. त्याच दृष्टीकोनातून इम्रान किंवा त्यांचा पक्ष नियमित काहीनाकाही मुद्दे उपस्थित करीत आहेत. या मुद्द्यांत सरकारला गुंगवून ठेवण्याचा इम्रान यांचा प्रयत्न आहे. दोन दिवसांपूर्वीच पीटीआय या इम्रान यांच्या पक्षाचे नेते शहबाज गील यांनी ट्विट करुन सरकारवर टीका केली होती. त्यात त्यांनी इम्रान खान यांची सुरक्षा गुरुवारपर्य़ँत काढणार असल्याचे सांगितले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की- दोषी मरियम नवाज यांना पंतप्रधानपदाची सुरक्षा देण्यात आली आहे तर दुसरीकडे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची सुरक्षा काढण्यात येते आहे. या ट्विटनंतर इम्रान यांच्या हत्येची शक्यता असलेल्या चर्चांना वेग आला. त्यापूर्वी फवाद चौधरी या इम्रान यांच्या नीकटवर्तीयांनी जाहीर केले की इम्रान रविवारी इस्लामाबादला परतत आहेत. या फव्वाद चौधरी यांनी एप्रिलमध्ये इम्रान यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचे सांगत, त्यांची सुरक्षा वाढवण्यात आल्याचे जाहीर केले होते.
या हत्येच्या अफवेचा परिणाम असा झाला आहे की, इस्लामाबादेतील इम्रान यांच्या निवासस्थानाची सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. इम्रान यांचे निवासस्थान बानी गाला या परिसरात सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. स्वता इम्रान यांनीह काही दिवसांपूर्वी आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगत, एक व्हिडीओ सुरक्षित ठिकाणी ठेवल्याचे जाहीर केले होते. हा व्हिडीओ त्यांच्या मृत्यूनंतर बाहेर येईल आणि त्याच अनेक नावे जाहीर होतील, अशी धमकीही त्यांनी दिली होती. आता या सगळ्या अफवेनंतर इस्लामाबाद पोलिसांनी केलेल्या ट्विटमध्ये, इम्रान यांच्या विवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवण्याचे सांगण्यात आले आहे. मात्र इम्रान यांच्या टीमकडून इम्रान परतले आहेत का, याची कोणतीही माहिती देण्यात आले नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.