इस्रायलच्या ताब्यात असलेल्या गोलान हाइट्सवर मागच्या शनिवारी हल्ला झाला. त्यानंतर खाडी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात तणाव वाढला आहे. इस्रायलने या हल्ल्यासाठी लेबनानमधील हिजबुल्लाहला जबाबदार ठरवलं होतं. हिजबुल्लाहला इराणच समर्थन आहे. गोलान हाइट्सवरील हल्ल्यानंतर इस्रायलने हिजबुल्लाहला इशारा दिला होता. किंमत चुकवावी लागेल असं स्पष्ट केलं होतं. लेबनानची राजधानी बेरुतवर काल इस्रायलने एअर स्ट्राइक केला. हा हल्ला यशस्वी झाला असून हिजबुल्लाहचा कमांडर ठार झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे. इस्रायली सैन्याच्या कारवाईत मंगळवारी हिजबुल्लाहचा कमांडर फउद शुकर ठार झाला. टार्गेटेड स्ट्राइक म्हणजे मर्यादीत स्वरुपाची ही कारवाई होती, असं इस्रायली सैन्याकडून सांगण्यात आलं. आम्ही आमच उद्दिष्ट्य पूर्ण केलं आहे. युद्ध सुरु करण्यासाठी आम्ही इच्छुक नाही असं इस्रायलने म्हटलं आहे.
अमेरिकेने फउद शुकरची माहिती देणाऱ्यासाठी 50 लाख डॉलर इनामी रक्कमेची घोषणा केली होती. हिजबुल्लाह कमांडरच्या नेमक्या स्थितीबद्दल आता काही सांगता येणार नाही, असं लेबनानच्या सुरक्षा सुत्रांनी सांगितलं. कमांडर फउद शुकर बऱ्याच काळापासून हिजबुल्लाहसाठी काम करत होता. तो हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाहचा लष्करी सल्लागार होता. 1983 साली यूएस मरिन कॉर्प्स बॅरकवरील हल्ल्यात शुकरची मुख्य भूमिका होती. अमेरिकन सैन्याशी संबंधित 241 जणांचा या हल्ल्यात मृत्यू झाला होता.
12 लहान मुलांसह काहीजणांचा मृत्यू
कमांडर फउद शुकर गोलान हाइट्सवरील हल्ल्यासाठी जबाबदार आहे, असा दावा इस्रायली सैन्याने केला आहे. गोलान हाइट्स येथे शनिवारी एका फुटबॉल मैदानात रॉकेट हल्ला झाला. यात 12 लहान मुलांसह काहीजणांचा मृत्यू झाला होता. “मजदल शम्स येथे लहान मुलं आणि अन्य इस्रायली नागरिकांच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या कमांडरला बेरुतमध्ये लक्ष्य करण्यात आलं” असं इस्रायली सुरक्षा पथक IDF कडून सांगण्यात आलं.
मोठ्या प्रमाणात तणाव
वरिष्ठ लेबनानी सुरक्षा सूत्राने सांगितलं की, ‘कमांडरच्या स्थितीबद्दल आता काही सांगता येणार नाही’. बेरुतमधील हरीत हरेक भागातील हिज्बुल्लाहच्या शूरा काऊन्सिलच्या आसपासच्या भागाला लक्ष्य केल्याच लेबनानच्या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटलं आहे. गोलान हाइट्सवरील हल्ल्यानंतर इस्रायल आणि लेबनानमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला. इस्रायलकडून हल्ला होणार, याची लेबनानला सुद्धा कल्पना होती. गोलान हाइट्स येथील मजदल शम्सच्या ड्रूज गावावर करण्यात आलेल्या हल्ल्लाला हे प्रत्युत्तर आहे.