Iran Israel War: इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्ष ऑक्टोबर महिन्यात कमालीचा वाढला होता. इराणने 1 ऑक्टोबर रोजी इस्त्रायलावर शेकडो क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता. त्यानंतर 26 ऑक्टोबर रोजी इस्त्रायलने जबरदस्त पलटवार केला. त्यात इराणची महत्वाची लष्करी केंद्र उद्ध्वस्त झाली. आता इस्त्रायलने केलेल्या जबरदस्त हल्ल्याची एक, एक माहिती समोर येत आहे. या हल्यात इराणमधील सेमनान प्रांतात असलेले शाहरौद स्पेस सेंटर उद्धवस्त झाले आहे. या ठिकाणावरुन इस्त्रायलवर इराणने क्षेपणास्त्र डागले होते. आता हा बेसच इस्त्रायलने संपवला आहे.
इराणमधील शाहरौद स्पेस सेंटरचे उपग्रहाचे फोटो समोर आले आहे. त्यात या स्पेस सेंटरची इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली दिसत आहे. इराणने इस्त्रालयवर 200 डागले होते. त्यातील बहुसंख्य क्षेपणास्त्र याच ठिकाणावरुन डागण्यात आले होते. इस्त्रायलच्या हल्ल्यात झालेल्या या नुकसानीबद्दल इराण सरकारकडून कोणतेही वक्तव्य केले जात नाही.
इस्रायली हल्ल्याच्या अगदी आधी इराणकडे इलाम, खुजेस्तान आणि तेहरान प्रांतात इस्त्रायल हल्ला करणार असल्याची माहिती होती. परंतु इस्रायलने सेमनान भागात जाऊन त्यांचे क्षेपणास्त्र तळ आणि स्पेस सेंटरला लक्ष्य केले. त्याची कल्पना इराणला नव्हती. या हल्ल्यात इराणच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे 80 टक्के घन इंधन नष्ट झाले आहे. त्यामुळे इराण पूर्वीसारखा हल्ला आता करु शकणार नाही. तसेच या केंद्राचे संरक्षण करणारी हवाई संरक्षण यंत्रणाही इस्रायलच्या हवाई हल्ल्यात नष्ट झाली.
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीजचे क्षेपणास्त्र तज्ज्ञ फॅबियन हिन्झ म्हणतात, इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु किती नुकसान झाले, त्याचा अंदाज लावणे अवघड आहे. शाहरौद बेस तेहरानपासून 370 किलोमीटर लांब उत्तर-पूर्व भागात आहे. त्याच ठिकाणी इमाम खमैनी स्पेस सेंटरसुद्धा आहे. या केंद्राची सर्वात मोठी इमारत इस्त्रायल हल्ल्यात उद्ध्वस्त झाली आहे. तसेच परचिन मिलिट्री कॉम्प्लेक्सचेही मोठे नुकसान झाले आहे.