मोठी बातमी : इस्रायलने उडवलं हिजबुल्लाहचं मुख्यालय, प्रमुखही मारला गेल्याची शक्यता

| Updated on: Sep 27, 2024 | 10:44 PM

इस्त्रायलच्या लष्कराने लेबनॉनमध्ये केलेल्या हल्ल्यात हिजबुल्लाहचं मुख्यालयाचं उडवून टाकलं आहे. या हल्ल्यात हिजबुल्लाहचा प्रमुख देखील मारला गेल्याचा दावा इस्रायलने केला आहे. पण अशी माहिती अजून समोर आलेली नाही, पण हिजबुल्लाहच्या अनेक वरिष्ठ कमांडरांना इस्रायलने या हल्ल्यातून ठार केले आहे.

मोठी बातमी : इस्रायलने उडवलं हिजबुल्लाहचं मुख्यालय, प्रमुखही मारला गेल्याची शक्यता
Follow us on

लेबनॉनची राजधानी बेरूतमधील दहेह भागात इस्रायलने मोठा हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात हिजबुल्लाहचे केंद्रीय लष्करी कमांड सेंटर उद्ध्वस्त झाले आहे. अशी माहिती इस्रायली लष्कराने दिली आहे. शुक्रवारी झालेल्या या हल्ल्याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. त्यात इमारती कोसळताना दिसत आहेत. या हल्ल्यात हिजबुल्लाहचा प्रमुख नसरल्लाह मारला गेल्याचा दावा केला जात आहे. नसराल्लाहही या मुख्यालयात उपस्थित होता, असा दावा इस्रायलकडून केला जात आहे. मात्र याची पुष्टी होऊ शकली नाही.

आयडीएफचे प्रवक्ते रिअर ॲडमिरल डॅनियल हगारी यांनी सांगितले की, इस्रायलच्या हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात हिजबुल्लाहच्या मुख्यालय उद्धवस्त झाले आहे. हे बेरूतमधील हिजबुल्लाचे मुख्यालय मानले जाते. आयडीएफच्या प्रवक्त्याने हिजबुल्लाह प्रमुख हसन नसराल्लाह यांना लक्ष्य केल्याचे देखील म्हटले आहे. पण ते घटनास्थळी होते की नाही हे सांगितलेले नाही.

30 किलोमीटरपर्यंत हादरा

हिजबुल्लाहच्या अल-मनार टीव्हीने सांगितले की, या स्फोटात चार इमारती जमीनदोस्त झाल्या. हा हल्लाइतका शक्तिशाली होता की त्यामुळे खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि बेरूतच्या उत्तरेला सुमारे 30 किलोमीटर अंतरावरील घरे हादरली. सायरन वाजवत रुग्णवाहिका स्फोटाच्या ठिकाणी जाताना दिसल्या. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात लोकं जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी संयुक्त राष्ट्राला संबोधित केल्यानंतर दहियाहच्या बेरूत उपनगरात हा हल्ला झाला, ज्यात त्यांनी हिजबुल्लाह विरुद्ध इस्रायलची मोहीम सुरूच ठेवण्याची शपथ घेतलीये. वृत्तानुसार, स्फोटाच्या काही वेळापूर्वी आधीच्या स्ट्राइकमध्ये मारल्या गेलेल्या एका वरिष्ठ कमांडरसह तीन हिजबुल्ला सदस्यांच्या अंत्यसंस्कारासाठी लोक जमले होते.

मोसादच्या मुख्यालयावरील हल्ल्याचा बदला

दोन दिवसांपूर्वी हिजबुल्लाने इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादच्या मुख्यालयावर क्षेपणास्त्र डागून हल्ला केला होता. ज्याचा इस्रायलने बदला घेतला. हिजबुल्लाने देशाच्या राजधानीजवळील मोसाद मुख्यालयावर कादर-1 बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले. बुधवारी रात्री तेल अवीवमध्ये चेतावणीचे सायरन ऐकू आले. मात्र, इस्रायलच्या रॉकेट एअर डिफेन्स सिस्टमने ही रॉकेट नष्ट केली. दोन दिवसांनंतर आता इस्रायलने लेबनॉनमध्ये हा भीषण हल्ला केला आहे.