iran israel cyber war: इराण आणि इस्त्रायल दरम्यान तणाव निर्माण झाला आहे. इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले केले. त्या हल्ल्यानंतर इस्त्रायलने बदला घेणार असल्याचे म्हटले होते. आता इस्त्रायलने एकही क्षेपणास्त्र डागले नाही. त्यानंतर इराण पूर्ण जायबंदी झाला आहे. इस्त्रायलने पुन्हा एक वेळेस जगाला धक्का बसेल, असे करुन दाखवले आहे. इराणवर इस्त्रायलने सायबर हल्ला केला आहे. या सायबर हल्ल्यामुळे इराणमधील ३० हजार संगणक बंद पडले आहेत. त्यात सरकारी कार्यालयातील संगणक तर आहेत, पण अणूउर्जा प्रकल्पांवरील संगणकसुद्धा आहेत. त्यामुळे इराणचे अणूउर्जा प्रकल्पच धोक्यात आले आहे.
रिपोर्टनुसार, इराण सरकारच्या अणुउर्जा प्रकल्पावर सायबर हल्ला झाला आहे. या माध्यमातून इस्त्रायलने इराणच्या अणूउर्जा प्रकल्पातील गोपनीय माहिती मिळवली आहे. इराणच्या सुप्रीम कॉन्सिल ऑफ सायबर स्पेसचे माजी सचिव फिरोजाबादी यांनी सांगितले की, सायबर हल्ल्यात इराण सरकारच्या तीन शाखा न्यायव्यवस्था, विधिमंडळ आणि कार्यपालिका यांच्यावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे ३० हजार संगणक ठप्प झाले आहेत.
सायबर हल्ल्यामुळे अणुऊर्जा प्रकल्प, बंदर वाहतूक नेटवर्क, इंधन वितरण प्रणाली आणि नगरपालिका नेटवर्कवर धोका निर्माण झाला आहे. तुर्कमेनिस्तानमध्ये एकीकडे इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी मैत्री वाढवत होते, तर दुसरीकडे इस्रायल इराणमध्ये सायबर हल्ले करत होते.
इस्त्रायलने आपली बदला घेण्याची धमकी खरी करुन दाखवली आहे. अमेरिकेने इराणचे अणूप्रकल्प आणि इंधन प्रकल्पावर हल्ला न करण्याचे इस्त्रायलला बजावले होते. मग इस्त्रायलने सायबर हल्ले करुन आपली धमकी खरी करुन दाखवली आहे. इस्त्रायलने इराणवर केलेला हा पहिला हल्ला आहे. आता यानंतर इस्त्रायल पुन्हा दुसरा कसा हल्ला करणार? याकडेही लक्ष लागले आहे.
इस्त्रायलची यंत्रणा सायबर हल्ले करण्यात चांगलीच तरबेज आहे. 14 वर्षांपासून ते या पद्धतीचे हल्ले करत आहेत. नुकताच पेजर हल्ल्यातून इस्त्रायलने दाखवून दिले की त्यांच्याकडे शत्रूंचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यांची गुप्तचर संस्था मोसादने यापूर्वी अनेक कामगिऱ्या फत्ते केल्या आहेत.