जेरुसलेम : इस्रायल आणि हमासमध्ये मागच्या अनेक वर्षांपासून हिंसक संघर्ष सुरु आहे. पण शनिवारी हमासने इस्रायलवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला. इस्रायल-हमास संघर्षाच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे. मोठ्या संख्येने पॅलेस्टाइन दहशतवादी आणि समर्थक गाझा पट्टीतून इस्रायलमध्ये घुसले. त्यानंतर पुढचे काही तास हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये अक्षरक्ष: धुमाकूळ घातला. त्यांनी मोठा विद्ध्वंस घडवला. आज इस्रायल-हमास संघर्षाचा तिसरा दिवस आहे. आता हळूहळू चित्र स्पष्ट होऊ लागलय. हमासने इस्रायलमध्ये क्रौर्याची परिसीमा गाठली. इस्रायलमधून काळाजाचा थरकाप उडवणारी दृश्य समोर येत आहेत. हमासचा अमानवीय चेहरा दिसून आलाय. हमासने यावेळी सैनिकी ठिकाणांना लक्ष्य केलं नाही. त्यांनी थेट नागरीवस्त्यांमध्ये घुसून हल्ले केले. इस्रायल-हमासच्या या संघर्षात आतापर्यंत दोन्हीबाजूला 1,100 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 700 पेक्षा जास्त इस्रायलमध्ये ठार झालेत. यात 44 सैनिक आहेत.
1973 नंतर प्रथमच इस्रायलने युद्धाची घोषणा केलीय. त्यावरुन परिस्थिती किती गंभीर आहे, ते लक्षात येतं. “हमासने जी आक्रमकता दाखवलीय, त्यातून एका मोठ्या, आव्हानात्मक युद्धाची सुरुवात झालीय. हमासचे सगळे तळ नष्ट करण्यात येतील” असा संकल्प इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी बोलून दाखवलाय. इस्रायलकडून रविवारी गाझा पट्टीत मोठ्या प्रमाणात एअर स्ट्राइक करण्यात आले. यात 413 जणांचा मृत्यू झालाय. हमसाने इस्रालयमध्ये अक्षरक्ष: रॉकेटचा पाऊस पाडला. हजारो रॉकेट्स डागले. हजारो दहशतवादी पाठवले. त्यांनी नागरिकांना लक्ष्य केलं व 100 जणांना बंधक बनवलं.
म्युझिक फेस्टीव्हलमध्ये रक्त, मृतदेहांचा खच
गाझा पट्टीतून दक्षिण इस्रायलमध्ये घुसखोरी झाली. त्यावेळी तिथे एक म्युझिक फेस्टीव्हल सुरु होता. हमासच्या दहशतवाद्यांनी तिथे हल्ला केला. त्या ठिकाणी आतापर्यंत 260 मृतदेह सापडले आहेत, इस्रायलच बचाव पथक ‘झाका’ने ही माहिती दिली. हमासच्या दहशवाद्यांनी हल्ला केला, तेव्हा काही लोक आपला बचाव करण्यासाठी गाडीमध्येच लपून राहिले. हा व्हिडिओ व्हायरल होतोय. इस्रायल-हमास संघर्षात जगाची दोन गटात विभागणी झाली आहे. अमेरिकेसह युरोप इस्रायलच्या बाजूने उभे आहेत. त्याचवेळी बहुतांश मुस्लिम देशांनी हमासला पाठिंबा दिलाय.