जेरुसलेम : सध्या इस्रायल आणि हमासमध्ये जोरदार युद्ध सुरु आहे. येणाऱ्या दिवसात हा संघर्ष आणखी वाढू शकतो. हमासने शनिवारी दहशतवादी हल्ला केला. इस्रायल आता त्याचा बदला घेत आहे. जगातील अरब आणि मुस्लिम देश हमासच्या हल्ल्यासाठी उलट इस्रायललाच जबाबदार ठरवत आहेत. इस्रायलकडून जी कारवाई सुरु आहे, ती किती चुकीची आहे, हे सुद्धा मुस्लिम देश ओरडून सांगत आहेत. जगातील अनेक मुस्लिम देशात इस्रायल विरुद्ध मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु आहे. पॅलेस्टाइनच्या नागरिकांबद्दल मोठ्या प्रमाणात सहानुभूती व्यक्त केली जात आहे. पण प्रत्यक्षात जेव्हा मदत करण्याची वेळ आली, तेव्हा एका मुस्लिम देशाने आपले हात खेचून घेतले आहेत. हा पॅलेस्टाइनसाठी मोठा झटका आहे. पॅलेस्टाइनला लागून असलेल्या मुस्लिम देशाने ही भूमिका घेतली आहे.
“आम्ही पॅलेस्टिनी नागरिकांना आमच्या देशात शरण देणार नाही” असं इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतेह अल-सिसी म्हणाले आहेत. शनिवारी हमासच्या दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर इस्रायली सैन्याकडून गाजा पट्टीत बॉम्बफेक सुरु आहे. इस्रायलने गाजा पट्टीतील नागरिकांना शहर रिकामी करण्याचा आदेश दिला आहे. इस्रायलच्या बॉम्ब वर्षावामुळे पळून येणाऱ्या लोकांना इजिप्तमध्ये आसरा मिळणार नाही, असं इजिप्तचे राष्ट्रपती मंगळवारी म्हणाले. इजिप्तच्या सरकारी एजन्सीच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. इजिप्तच्या या नियंत्रणामुळे गाजा पट्टी खाली करणाऱ्या नागरिकांचा बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग सुद्धा बंद झाला आहे.
बॉर्डर क्रॉसिंग बंद
मिस्रचे राष्ट्रपती अब्देल फतेह अल-सिसी म्हणाले की, “पॅलेस्टाइनचा मुद्दा चर्चेच्या माध्यमातून सोडवला जाईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे न्यायपूर्ण, शांती, स्वतंत्र आणि संप्रभु पॅलेस्टाइन राष्ट्राची स्थापना होऊ शकेल” शनिवारच्या हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायल आणि गाजा दरम्यान सर्व बॉर्डर क्रॉसिंग बंद करण्यात आले आहेत. गाजा आणि मिस्त्रमध्ये सुरु असलेल्या राफाच्या एकमात्र क्रॉसिंगवर इस्रायली सैन्याने मंगळवारी रात्री एयरस्ट्राइक केला.