जेरुसलेम : गाझा पट्टीत शुक्रवारी रात्री इस्रायलने एअरस्ट्राइक केला. यामध्ये दहशतवादी संघटना हमासचा एक मुख्य लीडर ठार झाला. इस्रायसलमधल्या एका वर्तमानपत्राने हा दावा केलाय. इस्रायली एअर फोर्सने एअर स्ट्राइकमध्ये हमासच्या एरियल फोर्सचा प्रमुख मुराद अबू मुरादला संपवलं. जिथून हमासच्या हवाई हल्ल्याची रणनिती आखली जायची, त्यावरच इस्रायली फोर्सने एअर स्ट्राइक केला. मागच्या शनिवारी हमासच्या दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलमध्ये घुसून धुमाकूळ घातला. अनेक निष्पाप नागरिकांची हत्या केली. नरसंहार केला होता. अबू मुरादने या दहशतवाद्यांना मार्गदर्शन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. हमासचे दहशतवादी ग्लायडर्सवरुन दक्षिण इस्रायलमध्ये दाखल झाले होते.
त्याशिवाय हमासने गाझा पट्टीतून एकाचवेळी जवळपास 5 हजार रॉकेट डागले. त्यामुळे इस्रायलची प्रसिद्ध आर्यन डोम यंत्रणाही फेल ठरली. आर्यन डोम गाझा पट्टीतून येणारी रॉकेट हेरुन त्यांना हवेतच संपवते. पण एकाचवेळी इतक्या रॉकेटना रोखणं आर्यन डोमलाही जमल नव्हतं. हमास कमांडो फोर्सच्या वेगवेगळ्या ठिकाणांना इस्रायली एअर फोर्सने लक्ष्य केलं. हेच दहशतवादी 7 ऑक्टोबरला इस्रायलमध्ये घुसले होते. इस्रायलकडून हमासवर सातत्याने हवाई हल्ले सुरु आहेत. गाझा पट्टीतील हमासच्या ठिकाणांना लक्ष्य केलं जात आहे.
हमासचे किती दहशतवादी ठार?
हमासने मागच्या शनिवारी इस्रायलवर इतिहासातील भीषण दहशतवादी हल्ला केला. यात शेकडो इस्रायली नागरिक ठार झाले. हमासच्या या भीषण हल्ल्यात इस्रायलमध्ये आतापर्यंत 1300 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलकडून प्रत्युत्तर म्हणून सुरु असलेल्या हवाई हल्ल्यात गाझा पट्टीत आतापर्यंत 1530 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलच्या हद्दीत हमासचे 1500 दहशतवादी ठार झाले आहेत.