तेल अविव | 15 ऑक्टोबर 2023 : इस्रायलबरोबर युद्ध करणं हमासला चांगलच महागात पडण्याची शक्यता आहे. सुरूवातीच्या काळात हमासने एकामागोमाग पाच हजार रॉकेटचा मारा करून इस्रायलचं कंबरडं मोडलं. इस्रायलला सळो की पळो करून सोडलं. मात्र, या हल्ल्याला न डगमगता आता इस्रायलने तोडीस तोड जवाब देऊन हमासला पळताभूई केलं आहे. हमासच्या अनेक तळांवर इस्रायलने हल्ले केले. अनेक अतिरेकी मारले. टॉपचे कमांडरही ढगात पोहोचवले आहेत. एअरस्ट्राईक करून हमासच्या अतिरेक्यांच्या तोंडचं पाणी पळवलं आहे. आता इस्रायलने आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे. इस्रायलने गाजा पट्टीतील वीज, पाणी आणि रेशन पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे गाजा पट्टीत पाण्याचं संकट ओढवलं असून येथील नागरिक पाण्यालाही मोताद झाले आहेत.
युद्धामुळे गाजा पट्टीत जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासत आहे. इस्रायलने गाजातील वीज आणि पाणी तोडलं आहे. त्यामुळे गाजावर अंधाराचं संकट ओढवलं आहे. गाजा पट्टीत पाणी मिळत नाहीये. वीज नाहीये. दुकानांमधील रेशन संपलं आहे. इंधन संपलं आहे. त्यामुळे येथील नागरिकांची चांगलीच नाकाबंदी झाली आहे. गाजा पट्टीतील रुग्णालयात लोक औषधांविना मरत आहेत. मात्र, तरीही इस्रायलने ही परिस्थितीत नियंत्रणात आणण्यासाठी हमासच्या अतिरेक्यांपुढे एक अट ठेवली आहे.
जोपर्यंत आमच्या ओलीस ठेवलेल्या लोकांना सोडलं जात नाही, तोपर्यंत गाजाला पाणी, वीज आणि इंधन मिळणार नाही. जोपर्यंत आमच्या लोकांना सोडलं जात नाही. तोपर्यंत आम्ही कोणतीही मानवी मदत देणार नाही. मानवता दाखवणार नाही. वीजेचा स्वीच ऑन केला जाणार नाही. हायड्रेंट उघडून पाणी देणार नाही आणि इंधनाचे ट्रक गाजात जाणार नाहीत, असं इस्रायलने बजावलं आहे.
हमासच्या अतिरेक्यांनी आतापर्यंत हजारो इस्रायली नागरिकांना ठार केलं आहे. तसेच अनेक लोकांना किडनॅप केलं आहे. 150 इस्रायली आणि विदेशी नागरिकांना अतिरेक्यांनी गाजामध्ये अज्ञात ठिकाणी ओलीस ठेवले आहे. त्यामुळे या नागरिकांना सोडल्याशिवाय दानापाणी सुरू करणार नसल्याचं इस्रायलने म्हटलं आहे.
इस्रायलने हमासच्या विरोधात पाच मोठी पावले उचलली आहेत. गाजातील वीज बंद केली. पाणी तोडलं. गाजातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. तसेच इंधन पुरवठाही बंद केला आहे. रेशन, खाण्याच्या पदार्थांचा पुरवठाही थांबवला आहे. औषधांचा पुरवठाही कमी झाला आहे. त्यामुळे गाजातील लोक अन्नपाण्या वाचून तडफत आहेत. गाजातील 50 हजार गर्भवती महिलांना आरोग्याच्या सुविधा मिळणं मुश्किल झालं आहे. त्यांना स्वच्छ पाणीही मिळत नाहीये.
दरम्यान, इस्रायलने गाजातील नागरिकांना 24 तासात गाजा सोडून जाण्यास सांगितलं आहे. गाजातील दक्षिणेकडे जाऊन राहण्यास इस्रायलने सांगितलं आहे. कारण इस्रायलला हमासविरोधात ग्राऊँड अॅक्शन घ्यायची आहे. त्यामुळे गाजातील नागरिकांना परिसर सोडून जायला सांगितंलं आहे. त्यामुळे गाजातील लाखो लोक कुटुंबकबिल्यासह घरदार सोडून पळून जात आहे. मात्र हमासच्या अतिरेक्यांकडून बंदुकीच्या धाकावर त्यांना रोखण्याचा प्रयत्नही होताना दिसत आहे.