Israel-Hamas War Live Updates : इस्रायल विरुद्ध हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम इतर देशांमध्ये देखील पाहायला मिळत आहे. चेचेन वंशाच्या एका शिक्षकाची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्यानंतर फ्रान्समध्ये अलर्ट घोषित करण्यात आला आहे. फ्रान्सने यानंतर 7000 सैन्य तैनात केले आहे. हल्लेखोराने शाळेतील आणखी तीन जणांना गंभीर जखमी केल्याची माहिती आहे. ही घटना ईशान्येकडील अरास शहरात घडली आहे. जिथे मोठ्या प्रमाणात ज्यू आणि मुस्लीम लोकं राहतात. पोलिसांनी संशयित हल्लेखोर मोहम्मद मोगुचकोव्ह याला अटक केली. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या घटनेचा इस्लामी दहशतवाद म्हणून निषेध केला आहे.
इस्त्रायली सैन्याने गाझातील लोकांना दक्षिणेकडे जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लष्कराच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायली लष्कराने आज उत्तर गाझामध्ये राहणाऱ्या नागरिकांना दक्षिणेकडे जाण्यासाठी दोन रस्त्यांचा वापर करण्यास सांगितले आहे. या सूचनेनंतर इस्रायल गाझामध्ये हल्ले करण्याची शक्यता यूएनने व्यक्त केली आहे.
थायलंडच्या पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांनी माहिती देताना सांगितले की, इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षात 24 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. थायलंडच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, दोन आणखी थाई नागरिक जखमी झाले असून एकूण जखमींची संख्या 16 झाली आहे.
गाझा सीमेनंतर आता लेबनॉनमधून इस्रायलमध्ये घुसखोरीचा प्रयत्न होत आहे. इस्रायलच्या लष्कराकडून अशा दहशतवाद्यांचा खात्मा केला जात आहे. आतापर्यंत इस्रायलने शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. हमासला संपवण्यासाठी इस्रायलकडून आणखी हल्ले वाढवले जावू शकतात. यासाठी तीन लाख सैन्य तयार ठेवण्यात आलं आहे. या पृथ्वीवरुन हमासला पूर्णपणे नष्ट केले जाईल असे इस्रायलच्या पंतप्रधानांनी म्हटले आहे.
‘द टाइम्स ऑफ इस्रायल’ने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायली लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात हमास या दहशतवादी संघटनेच्या कमांडरचा खात्मा झाला आहे. हवाई गटाचा प्रमुख मुराद अबू मुराद या हल्ल्यात मारला गेलाय. अबू मुरादने गेल्या आठवड्यात झालेल्या हत्याकांडात दहशतवाद्यांना मार्गदर्शन करण्यात मोठी भूमिका बजावली होती.