तेल अविव | 15 ऑक्टोबर 2023 : इस्रायल आणि हमासमधील युद्ध आता विद्ध्वंसक वळणावर येऊन ठेपलं आहे. कोणत्याही क्षणी काहीही घडू शकतं इतकं टोकाचं हे युद्ध सुरू आहे. इस्रायलने गाजा पट्टीतील वीज, पाणी, इंधन, औषधे, रेशन आणि इंटरनेट सेवा सर्व काही बंद करून टाकलं आहे. त्यामुळे गाजा पट्टीतील लोक अस्वस्थ झाले आहेत. त्यांचं जगणं मुश्कील झालेलं असतानाच इस्रायलने गाजा पट्टीवर एअरस्ट्राईक सुरू केला आहे. चारही बाजूंनी हमासला घेरण्याचा इस्रायलचा प्लान आहे. आकाशातून युद्ध करतानाच आता इस्रायलने ग्राऊंड ऑपरेशन करण्याचीही तयारी सुरू केली आहे. मात्र, एका कारणामुळे हे ग्राऊंड ऑपरेशन थांबलं आहे. फक्त एक इशारा मिळण्याचा अवकाश की हमास नकाशावरूनच गायब होईल, अशी तयारीच इस्रायलने केली आहे.
इस्रायलला गाजा पट्टीत प्रचंड मोठा हल्ला करायचा आहे. पण अमेरिकेने या ऑपरेशनला परवानगी दिलेली नाही. या मुद्द्यावरून अमेरिकेची स्थिती दोलायमान आहे. अमेरिकेकडून परवानगी मिळण्यास उशीर होत आहे. त्यामुळे इस्रायलचं ग्राऊंड ऑपरेशन थांबलं आहे. गाजा पट्टीतून नागरिक गेल्याशिवाय ग्राऊंड ऑपरेशन करू नये असं अमेरिकेला वाटतंय. त्यामुळे अमेरिकेने परवानगी दिली नाही. दुसरीकडे इस्रायलने हे ऑपरेशन करता यावं म्हणून गाजा पट्टीतील नागरिकांना दक्षिण गाजा पट्टीत जाण्यासाठी 24 तासांची मुदत दिली आहे. त्या 24 तासातील आता फक्त तीन तास उरले आहेत. त्यानंतर डोअर टू डोअर टू डोअर ऑपरेशन सुरू होणार आहे.
इस्रायलच्या आयडीएफने याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. आम्ही सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेच्या दरम्यान कोणतंही ऑपरेशन करणार नाही. त्यामुळे लोकांनी उत्तर गाजातून दक्षिण गाजाकडे जावं. नागरिक जात असलेल्या मार्गावर आम्ही हल्ला करणार नाही. त्यामुळे या मार्गाने निघून जाण्याची संधी लगेच साधा. तीन तासानंतर आमचे हल्ले सुरू होणार आहेत, असं आयडीएफने म्हटलं आहे. तसेच तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी आमच्या सूचनांचं पालन करा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
घोषित कारण- खराब हवामान
खरं कारण- अमेरिकेची अद्याप मंजुरी नाही
अमेरिकेला आधी मध्यपूर्वेतील देशांना विश्वासात घ्यायचंय
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अनेक देशांशी बोलत आहे
याच कारणास्तव ब्लिंकन मध्यपूर्वेच्या दौऱ्यावर आहेत.
अनेक देश इस्रायलच्या हल्ल्याच्या विरोधात आहेत.
ईराणने तर या मुद्द्यावरून धमकीही दिली आहे.
जर एकतर्फी युद्ध सुरू झाल्यास या युद्धात ईराण, सीरिया आणि लेबनानही उतरण्याची शक्यता आहे.