इस्रायलच सध्या लेबनानमध्ये ग्राऊंड ऑपरेशन सुरु आहे. इस्रायली सैन्य लेबनानमध्ये घुसलं आहे. इस्रायली सैन्याने मागच्या चार दिवसात हिज्बुल्लाहचे 2000 पेक्षा अधिक सैन्य तळ नष्ट केले आहेत. हिज्बुल्लाहच्या जवळपास 250 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यामध्ये हिज्बुल्लाहचे पाच बटालियन कमांडर, 10 कंपनी कमांडर आणि सहा प्लाटून कमांडर आहेत. इस्रायली एअर फोर्स दक्षिण लेबनानमध्ये गोपनीय माहितीच्या आधारावर एअर स्ट्राइक करत असल्याची माहिती IDF ने दिली आहे. “मागच्या चार दिवसात 2000 पेक्षा अधिक सैन्य तळ आणि 250 हिज्बुल्लाह दहशतवाद्यांना संपवलं आहे. यात 5 बटालियन कमांडर, 10 कंपनी कमांडर आणि 6 प्लाटून कमांडर आहेत” IDF ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही माहिती दिली आहे.
“अचूक गोपनीय माहितीच्या आधारावर इस्रायली सैनिकांना एका घरामधून रॉकेट लॉन्चर, दारुगोळा, एंटी टँक मिसाइल आणि रॉकेट मिळाले. त्याशिवाय इमारती आणि घरांमध्ये अनेक शस्त्र सापडली. इस्रायली क्षेत्र त्यांचं टार्गेट होतं. शस्त्रांमध्ये रणगाडा विरोधी मिसाइल, फायरआर्म्स आणि स्फोटक उपकरणं आहेत” आयडीएफने पोस्टद्वारे ही माहिती दिलीय. इस्रायल लेबनानमध्ये हिज्बुल्लाह विरोधात लढाई लढत आहे. त्याचवेळी इराणने इस्रायलवर मिसाइस हल्ला केला. इस्रायलने अजून या हल्ल्याला उत्तर दिलेलं नाही.
त्यानंतर भयानक युद्धाची सुरुवात
इस्रायल पॅलेस्टाइनमध्ये मागच्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. पण मागच्यावर्षी 7 ऑक्टोंबर 2023 रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये घुसून हल्ला केला. यात 1200 नागरिकांची निर्घृण हत्या करण्यात आली. 250 इस्रायलींच अपहरण केलं. त्यानंतर एका भयानक युद्धाची सुरुवात झाली. गाजाच्या आरोग्य मंत्रालयानुसार, इस्रायलने गाजा पट्टीत केलेल्या कारवाईत 41 हजारपेक्षा अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. गाजाची जवळपास सगळी लोकसंख्या विस्थापित झाली आहे. इस्रायलवर नरसंहाराचे आरोप आहेत.