241 अमेरिकन नागरिकांच्या मृत्यूला जबाबदार, 60 कोटीच इनाम…खतरनाक दहशतवाद्याचा इस्रायलकडून खात्मा

| Updated on: Sep 21, 2024 | 8:58 AM

Israel vs Hezbollah : इस्रायलने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. सलग चौथ्या दिवशी हिज्बुल्लाहला दणका दिला आहे. अत्यंत अचूक माहितीच्या आधारावर एअर स्ट्राइक केला. यात 241 अमेरिकन नागरिकांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या खतरनाक दहशतवाद्याचा खात्मा केला.

241 अमेरिकन नागरिकांच्या मृत्यूला जबाबदार, 60 कोटीच इनाम...खतरनाक दहशतवाद्याचा इस्रायलकडून खात्मा
ibrahim aqil
Follow us on

इस्रायलने हिज्बुल्लाह विरोधात मोर्चा उघडला आहे. मागच्या चार दिवसात इस्रायलने हिज्बुल्लाह विरोधात मोठी कारवाई केली आहे. लेबनानमध्ये पाळमुळं भक्कम करणाऱ्या हिज्बुल्लाहला आपल्या विरोधात अशी काही कारवाई होईल, याची अजिबात कल्पना नव्हती. मंगळवारी पेजर ब्लास्ट, बुधवारी वॉकी-टॉकी ब्लास्ट, गुरुवारी एअर स्ट्राइक पुन्हा शुक्रवारी एअर स्ट्राइक एकापाठोपाठ एक हल्ले करुन इस्रायलने हिज्बुल्लाहच कंबरडं मोडून टाकलं आहे. इस्रायली सैन्याने शुक्रवारी लेबनानची राजधानी बेरुतवर हवाई हल्ला केला. यात हिज्बुल्लाहचा टॉप कमांडर मारला गेला. इब्राहिम अकील या हिज्बुल्लाहच्या कमांडरचा खात्मा झाला. एकूण 7 जणांचा मृत्यू झाला, 59 जण जखमी झाले.

7 ऑक्टोबर 2023 ला इस्रायल-हमासमध्ये युद्धाला सुरुवात झाली. त्यानंतर बेरुतच्या दक्षिण भागात झालेला हा तिसरा हवाई हल्ला आहे. या भागातील संघर्ष आता गाजावरुन लेबनानमध्ये शिफ्ट झाला आहे. इस्रायलची गाजा पट्टीत हमास बरोबल लढाई सुरु असताना लेबनानमधून हिज्बुल्लाह उत्तर इस्रायलवर रॉकेट हल्ले करत होता. गाजापट्टीतील उद्दिष्ट्य साध्य केल्यानंतर इस्रायलने आता लेबनानकडे मोर्चा वळवला आहे.

कोण होता इब्राहीम अकील?

इस्रायलने हिजबुल्लाहच्या ज्या इब्राहीम अकीलचा खात्मा केला, तो मोठा कमांडर होता. रादवान फोर्सचा प्रमुख होता. फुआद शुकरनंतर हिज्बुल्लाहच्या सशस्त्र पथकाचा सेकंड कमांडर-इन-चीफ होता. सऊदी अल-हदथ चॅनलने हिज्बुल्लाहच्या एका जवळच्या सूत्राच्या हवाल्याने इब्राहीम अकीलच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. अकील हिजबुल्लाहच्या इस्लामिक जिहाद संघटनेचा प्रमुख सदस्य होता.

241 अमेरिकन नागरिकांच्या मृत्यूला जबाबदार

एप्रिल 1983 मध्ये बेरुत येथील अमेरिकन दूतावासावर बॉम्ब हल्ला झाला होता. त्याची जबाबदारी इब्राहीम अकीलने घेतली होती. या हल्ल्यात 63 जणांचा मृत्यू झाला होता. ऑक्टोबर 1983 मध्ये यूएस मरीन कॉर्प्स बॅरकवर झालेल्या हल्ल्यात 241 अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी अकीलने अमेरिकन आणि जर्मन नागरिकांना बंधक बनवण्याचा आदेश दिला होता. अमेरिकेने एप्रिल 2023 मध्ये त्याच्याविषयी माहिती देणाऱ्याला 7 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 60 कोटी रुपयांच इनाम घोषित केलं होतं.