जगात सध्या इस्रायल विरुद्ध हमास, इस्रायल विरुद्ध हिजबुल्लाह आणि रशिया विरुद्ध युक्रेन असा संघर्ष सुरु आहे. इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या सैनिकांच्या पेजर आणि वॉकी टॉकीमध्ये स्फोट घडवून आणला. ज्यामुळे ३ हजाराहून अधिक लोकं जखमी झाले आणि ११ लोकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हिजबुल्लाह आणि इस्रायल यांच्यात नवं युद्ध सुरु झालं आहे. इस्रायलकडून हिजबुल्लाहच्या ठिकाणांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे लेबनॉन युद्धाचे केंद्र बनले आहे. इस्रायलने आता हिजबुल्लाच्या विरोधात आघाडी उघडली आहे. इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांना लक्ष्य करत ती नष्ट केली आहेत. ज्यामुळे हिजबुल्लाहने कमांडर देखील मारले गेले आहेत. हिजबुल्लाहही माघार घेण्याच्या विचारात नाही. कारण त्यांच्याकडून पण इस्रायलवर हल्ले सुरु आहे.
इस्रायलचे लष्कर प्रमुख जनरल हरजी हालेवी यांनी हिजबुल्लाहच्या ठिकाणांना उद्ध्वस्त करण्यासाठी हवाई हल्ले सुरूच ठेवणार असल्याचं सांगितले आहे. गरज पडली तर सीमेपलीकडे जाऊन जमिनीवर कारवाईही करू, असेही ते म्हणाले आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की, इस्रायली सैन्य लेबनॉनच्या दिशेने कूच करण्यासाठी सज्ज आहे.
लेबनॉनमधील भारतीय दूतावासाने बुधवारी एक ॲडव्हायझरी जारी करून भारतीयांना पुढील आदेश मिळेपर्यंत लेबनॉनमध्ये प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे. दूतावासाने आपल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, 1 ऑगस्ट 2024 रोजी जारी केलेल्या सल्ल्यानुसार, भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत लेबनॉनला प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांनी लेबनॉनमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना शक्य तितक्या लवकर देश सोडण्याचा सल्ला दिला आहे आणि लोकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा आणि दूतावासाच्या संपर्कात राहण्याचा सल्ला दिला आहे.
लेबनॉनमध्येही युद्ध सुरू होण्याची भीती असताना अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी लेबनॉनमध्ये युद्ध भडकू शकते, असे म्हटले आहे. युद्ध झाले तर तुर्कस्तानने युद्धात लेबनॉनच्या पाठीशी उभे राहण्याची घोषणा केली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन भारताने लेबनॉनमध्ये उपस्थित असलेल्या आपल्या नागरिकांना तेथून त्वरित निघून जाण्यास सांगितले आहे. बुधवारी इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यात लेबनॉनमध्ये 51 जण ठार तर 223 जखमी झाले आहेत.
Advisory dated 25.09.2024 pic.twitter.com/GFUVYaqgzG
— India in Lebanon (@IndiaInLebanon) September 25, 2024
इस्रायलच्या सीमेला लागून असलेल्या लोकांना त्यामुळे आपले घर सोडून दुसरीकडे जावे लागत आहे. आतापर्यंत पाच लाखांहून अधिक लोकांनी घरे सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे.