इस्रायलने हमास पुढे ठेवला युद्ध संपवण्याचा प्रस्ताव पण ठेवली ही मोठी अट

| Updated on: Sep 20, 2024 | 5:38 PM

इस्रायलने हमासपुढे युद्ध संपवण्यासाठी प्रस्ताव ठेवला आहे. आखाती देशांसोबत एकटा भिडणारा देश इस्रायलने हा प्रस्ताव ठेवला असला तरी एक अट देखील ठेवली आहे. हमासने मात्र हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. हमासने ओलिसांना सोडण्यासाठी हा प्रस्ताव इस्रायलने दिला होता. इस्रायल देखील कैद असलेल्या पॅलेस्टिन लोकांना सोडण्यास तयार होता.

इस्रायलने हमास पुढे ठेवला युद्ध संपवण्याचा प्रस्ताव पण ठेवली ही मोठी अट
Follow us on

गेल्या एक वर्षापासून हमास आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरु आहे. इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायलच्या पंतप्रधानांनी हमासच्या विरोधात युद्धाची घोषणा केली होती. हमासचा संपवण्याची शपथ त्यांनी घेतली होती. पण आता बातमी येत आाहे की, इस्रायलने युद्ध संपवण्याची तयारी दर्शवली आहे. इस्रायलचे म्हटले की, जर सर्व ओलीसांना एकत्र सोडण्यात आले आणि गाझा नि:शस्त्र केले गेले तर हा संघर्ष संपवला जाईल. ओलिसांच्या नातेवाईकांनी योजनेचे कौतुक केले आहे. पण हमासच्या एका अधिकाऱ्याने हे ‘हास्यास्पद’ असल्याचे म्हणत फेटाळून लावले आहे.

इस्रायलने एक प्रस्ताव हमासपुढे ठेवला आहे. ज्यामध्ये गाझा पट्टीतील लढाई संपववली जाईल असं सांगण्यात आलं आहे. पण इस्रायलने यासाठी काही अट ठेवली आहे. हमासच्या प्रमुखाला तेथून बाहेर पडण्याचा सुरक्षित मार्ग दिला जाईल. त्या बदल्यात, गाझामध्ये ओलिस ठेवलेल्या सर्वांची तात्काळ सुटका करावी लागेल. गाझा पट्टीचे सैन्यीकरण केले जाईल आणि तेथे पर्यायी प्रशासकीय प्राधिकरण स्थापन केले जाईल.

टाईम्स ऑफ इस्रायलच्या अहवालानुसार, एका इस्रायली अधिकाऱ्याने सांगितले की, सरकारचे प्रतिनिधी, गॅल हिर्श यांनी ही योजना अमेरिकन अधिकाऱ्यांसमोर मांडली होती, ज्यांनी ती अरब अधिकाऱ्यांकडे सोपवली होती. व्हाईट हाऊस आणि स्टेट डिपार्टमेंटच्या अमेरिकन अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव गेल्या आठवड्यात मांडण्यात आल्याचे हिर्श यांनी सांगितले.

या प्रस्तावात गाझा पट्टीमध्ये ओलिस ठेवण्यात आलेल्या सर्व 101 जणांना ताबडतोब सोडण्यात यावे. इस्रायल यानंतर युद्ध समाप्त करेल. सैन्याला हळूहळू माघारी घेतले जाईल.  7 ऑक्टोबरच्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या सिनवारला गाझा पट्टी सोडण्याची परवानगी देऊन इस्रायल आपल्या तुरुंगातून  पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करेल.

हमासने प्रस्ताव फेटाळला

दरम्यान, हमास पॉलिटब्युरोचे सदस्य गाझी हमाद यांनी तात्काळ हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. त्यांनी सांगितले की, “सिनवारच्या बाहेर पडण्याचा प्रस्ताव हास्यास्पद आहे. हमाद म्हणाले की, “इस्रायलच्या हट्टी भूमिकेमुळे वाटाघाटी रखडल्या आहेत.” हमासने हा प्रस्ताव फेटाळल्याने आता इस्रायल नवीन प्रस्ताव देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.