इस्रायलने आज सकाळी त्यांचा मोठा शत्रू, हमासचा प्रमुख इस्माइल हानियाला संपवलं. हानियाला मारण्यासाठी इस्त्रायलने इराणची राजधानी तेहरानची निवड केली. एकदिवस आधीच हानिया इराणच्या नव्या राष्ट्रपतींच्या शपथग्रहण सोहळ्यात दिसला होता. दुसऱ्याचदिवशी इस्रायलने त्याला संपवलं. हानियाच्या मृत्यूकडे इस्रायलचा मोठा विजय या दृष्टीने पाहिलं जातय. इस्रायलने अजूनपर्यंत हल्ला आपणच केल्याच कबूल केलेलं नाही. हानियाच्या मृत्यूनंतर इस्रायलमध्ये मंत्र्यांसह सर्वसामान्यांनी सेलिब्रेशन सुरु केलय. इस्रायलचे मंत्री अमीचाय एलियाहू पहिले व्यक्ती आहेत, ज्यांनी अधिकृतपणे इस्माइल हानियाच्या मृत्यूवर प्रतिक्रिया दिली आहे.
‘जगातील ही घाण साफ करण्याची हीच योग्य पद्धत आहे’ असं अमीचाय एलियाहू यांनी म्हटलं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हानियाच्या मृत्यूबद्दल काहीही बोलण्यास मंत्र्यांना मनाई केल्याच इस्रायलच्या स्थानिक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे, तरीही अमीचाय एलियाहू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हमास प्रमुख इस्माइल हानिया मंगळवारी इराणचे नवीन राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांच्या शपथ ग्रहण समारंभात सहभागी झाला होता. या दरम्यान त्याने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांची भेट घेतली.
हानियाला कसं मारलं?
त्यानंतर दुसऱ्यादिवशी सकाळी म्हणजे आज बुधवारी इस्रायलने इस्माइल हानियाच तेहरानमधील घरच उडवून दिलं. इस्रायलने 24 तासांच्या आत दोन ऑपरेशन्स केली. इस्रायलने काल लेबनानची राजधानी बेरुतवर एअर स्ट्राइक केला. त्यात हिजबुल्लाहचा कमांडर फउद शुकर ठार झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे. गोलान हाइट्सवरील हल्ल्याचा बदला म्हणून इस्रायलकडून ही कारवाई करण्यात आली.