ISRO SPADEX : आजचा दिवस खास आहे. कारण, आज ISRO 2 उपग्रहांचे प्रक्षेपण करणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था आज रात्री 9 वाजून 58 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून PSLV C60 रॉकेटद्वारे दोन उपग्रहांचे प्रक्षेपण करणार आहे.
भारतासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे. कारण या माध्यमातून अंतराळात डॉकिंग आणि अनडॉकिंग तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी घेणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा समावेश होणार आहे. या यशानंतर या तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे.
स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट (स्पेडेक्स) असे या मोहिमेचे नाव असून, त्याअंतर्गत एसडीएक्स-01 आणि एसडीएक्स-02 हे दोन उपग्रह अंतराळात प्रस्थापित केले जाणार आहेत. हे उपग्रह 476 किमी उंचीवर पृथ्वीच्या कक्षेत स्थापित केले जातील. उपग्रहांच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर जानेवारी 2025 च्या पहिल्या आठवड्यापासून या उपग्रहांद्वारे अंतराळात डॉकिंग आणि अनडॉकिंगच्या तंत्रज्ञानाची चाचणी सुरू होईल.
अंतराळ मोहिमांमध्ये डॉकिंग तंत्रज्ञानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हे तंत्रज्ञान अंतराळातील अंतराळयानांना एकमेकांशी जोडण्याची क्षमता प्रदान करते. दीर्घकालीन अंतराळ मोहिमा, मानवी मोहिमा आणि अंतराळयानांमध्ये पुरवठा पाठविणे यासारख्या महत्त्वाच्या कामांमध्ये याचा वापर केला जातो.
इस्रोची स्पेडेक्स मोहीम ही भारतासाठी अंतराळ विज्ञानाच्या क्षेत्रात नवी सुरुवात तर आहेच, शिवाय भविष्यातील अंतराळ मोहिमांचा मार्गही मोकळा करणार आहे.
या मोहिमेसाठी PSLV C60 रॉकेटची निवड करण्यात आली आहे. हे इस्रोचे अग्रगण्य आणि विश्वासार्ह प्रक्षेपक आहे. या रॉकेटने यापूर्वी अनेक महत्त्वाच्या मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. स्पेडेक्स मोहिमेच्या माध्यमातून डॉकिंग तंत्रज्ञानाची चाचणी आणि विकास भारताच्या अंतराळ मोहिमांना स्वावलंबी आणि प्रगत बनवेल, असे इस्रोने म्हटले आहे. या मोहिमेमुळे इस्रोची तांत्रिक क्षमता आणि जागतिक अंतराळ संशोधनात भारताची भूमिका अधिक बळकट होणार आहे.
इस्रोच्या स्पेडेक्स मोहिमेमुळे देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या मोहिमेचे यश भारताला अंतराळ विज्ञानाच्या नव्या आयामांवर घेऊन जाईल. या मोहिमेमुळे भारताच्या अंतराळ संशोधनाला अधिक बळकटी मिळेल आणि भविष्यातील मानवी अंतराळ मोहिमांचा भक्कम पाया तयार होईल. इस्रोच्या या नव्या उपक्रमामुळे भारताला अंतराळ संशोधनाच्या जागतिक व्यासपीठावर पुन्हा एकदा भक्कम स्थान देण्याचे आश्वासन मिळाले आहे.