टोकियो : जगाला हादरवणारी मोठी बातमी आहे. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या भाषणावेळी भीषण बॉम्बस्फोट झाला. या दुर्घटनेतून किशिदा थोडक्यात बचावले आहे. त्यांना सुरक्षा रक्षकांनी सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. तसेच एका संशयतिला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. जपानच्या वाकायामा येथे निवडणूक प्रचाराचे भाषण करत असताना ही घटना घडली. त्यामुळे या परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे. तसेच या परिसरात पोलिसांची मोठी कुमक मागवण्यात आली आहे. याशिवाय वाकायामा येथील सर्व रस्ते बंद करण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
पंतप्रधान फुमियो किशिदा हे निवडणूक प्रचारासाठी वाकायामा येथे आले होते. यावेळी त्यांचे भाषण सुरू होणार होते. इतक्यात अज्ञात व्यक्तीने त्यांच्या दिशेने बॉम्ब फेकला. बॉम्ब फेकताच सर्वत्र धूर पसरला. अचानक झालेल्या या प्रकाराने भाषण ऐकायला आलेले किशिदा समर्थ घाबरले आणि त्यांच्यात एकच घबराट पसरली. लोक किंचाळत इकडे तिकडे पळत होते. जीवमुठीत घेऊन लोक धावत होते. तर पोलिसांचीही तारांबळ उडाली होती. बॉम्ब स्फोट झाल्या झाल्या पोलीस स्टेजकडे वळले आणि त्यांनी पंतप्रधानांभोवती कडं करत त्यांना सुरक्षित स्थळी नेले.
या हल्ल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल आहे. त्यानुसार हा स्फोट अत्यंत भीषण होता. बॉम्ब फेकण्यात आल्यानंतर प्रचंड आवाज झाला. लोक त्यामुळे घाबरून पळाले आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. तसेच त्याच्यासोबत आणखी कोणी आहे का? त्याने कुणाच्या सांगण्यावरून हा प्रकार केला याची चौकशीही पोलीस करत आहेत. लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या एका उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान आले होते. त्यावेळी ही घटना घडली. पंतप्रधान फुमियो किशिदा हे प्रचारासाठी आले असता त्यांनी बॉम्बस्फोट होण्यापूर्वी नागरिकांसोबत फोटो काढले. सेल्फीही घेतल्या. त्यापूर्वीच्या व्हिडीओत दिसून आले.
जपानच्या पंतप्रधानांची सुरक्षा ही भारताच्या पंतप्रधानांसारखी नसते. जपानमध्ये कठोर कायदे आहेत. त्यामुळे जपानमध्ये कमी विदेशी दिसतात. जपान हा सुरक्षित देश आहे. त्यामुळे तिथे सुरक्षेची गरज पडत नाही. परंतु, शिंजो अबे यांच्यावर झालेल्या हल्ल्यांतर पोलिसांनी सुरक्षेचा आढावा घेतला. त्यानंतर सुरक्षा वाढवण्यात आली. आता पंतप्रधानांच्या सभेत बॉम्बस्फोट झाल्याने पुन्हा एकदा येथील सुरक्षा यंत्रणांना पंतप्रधानांच्या सुरक्षेचा आढावा घ्यावा लागणार आहे. कारण हिरोशिमा येथे जी-7ची जोरात तयारी सुरू आहे.