भारतात लोकसंख्या वाढीचा दर रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. दोन पेक्षा जास्त मुले असणाऱ्या लोकांची सवलती बंद करण्याची मागणी होत आहे. परंतु आशिया खंडातील जपानमध्ये वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जपानमध्ये जन्मदर कमी होत आहे आणि मृत्यूदर वाढत आहे. त्यामुळे येत्या काळात जपानमधील तरुणांची संख्या कमी होणार आहे. ही परिस्थिती ओळखून जपान सरकारने एक योजना तयार केली. सरकारने 2024 च्या अर्थसंकल्पात बालकांच्या जन्मासाठी एक योजना मांडली. तरुण जोडप्यांना अधिक मुले होण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने विशेष निधीची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. तब्बल 34 अब्ज डॉलरची ही तरतूद केली आहे. त्यात मुलांच्या शिक्षणासाठी अनुदानही देण्यात येणार आहे.
एकीकडे देशाचा मृत्यूदर वाढत आहे तर दुसरीकडे जन्मदर कमी होत आहे. जपान सरकारने बुधवारी देशाच्या लोकसंख्येबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार जपानच्या लोकसंख्येत सलग पंधरा वर्षी घट आली आहे. देशातील घटता जन्मदर आणि वाढता मृत्यूदर यामुळे पाच लाखांहून अधिक लोकसंख्या कमी झाली आहे.
सन 2070 पर्यंत, जपानची लोकसंख्या अंदाजे 30% कमी होण्याचा अंदाज एका अहवालातून आला आहे. जपानची लोकसंख्या 87 दशलक्ष पर्यंत घसरण्याची शक्यता आहे. लोकसंख्या घटण्याबरोबरच देशातील तरुणांची कमी होणारी लोकसंख्या देखील जपानसाठी समस्या बनणार आहे. अंदाजानुसार, 2070 मध्ये, देशातील प्रत्येक 10 लोकांपैकी चार लोक 65 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे असतील. यामुळे जपानने लोकसंख्या वाढीसाठी प्रोत्साहन देण्याचे सुरु केले आहे.
जपानमधील तरुणांना लग्न करायचे नाही आणि लग्न झाले तरी त्यांना मुले होऊ द्यायची नाहीत, असे या सर्वेक्षणातून समोर आला आहे. जपानमध्ये स्त्रिया नोकरी आणि कामाकडे अधिक झुकतात, त्यामुळे मुले न होऊ देण्याकडे त्यांचा कल आहे. मुलांना जन्म दिल्यानंतर त्यांना मातांची जबाबदारी पार पाडावी लागते, त्यामुळे त्यांचे लक्ष कामाकडे कमी होते, असे त्या देशातील तरुणींना वाटते. तसेच कॉर्पोरेट संस्कृतीत नोकरी करणाऱ्या गर्भवती मातांना अनेकदा नोकरी मिळणे कठीण होते, त्यामुळे महिलांना मुले होऊ देत नाहीत.
जपानमधील जन्मदर वर्षानुवर्षे कमी होत आहे. यावेळी जन्मदरात विक्रमी घट नोंदवण्यात आली. गेल्या वर्षी जपानमध्ये 7 लाख मुलांचा जन्म झाला. तसेच, गेल्या वर्षी 1.58 दशलक्ष मृत्यूची नोंद झाली होती. 1 जानेवारी रोजी जपानची लोकसंख्या 124.9 दशलक्ष होती. तसेच देशातील परदेशी रहिवाशांची लोकसंख्या 11% वाढली आहे, ज्यामुळे देशाची लोकसंख्या प्रथमच 3 दशलक्षांपेक्षा जास्त वाढली आहे.