वॉशिंग्टन : अल कायदाचा मोहरक्या आणि मोस्ट वाँटेड दहशतवादी अयमान अल जवाहिरी (Ayman al-Zawahiri) याचा अफगाणिस्तानात घुसून अमेरिकेने खात्मा (US strike Afghanistan) केला आहे. सीआयएने काबूलमध्ये ड्रोन हल्ला करून जवाहिरीला यमसदनी पोहोचवले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (joe biden) यांनीही जवाहिरी ठार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अमेरिकेने केलेल्या या यशस्वी ऑपरेशननंतर जो बायडेन यांनी आता न्याय झाला अशी प्रतिक्रिया दिली आहे. 11 सितंबर, 2001मध्ये अमेरिकेवर झालेल्या हल्ल्यात ठार झालेल्यांच्या कुटुंबीयांसाठी ही दिलासादायक बातमी असेल अशी आशा बाळगतो, असंही बायडेन यांनी म्हटलं आहे. सोमवारी संध्याकाळी व्हाइट हाऊसमध्ये जो बायडेन यांनी भाषण दिलं. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं. अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अल जवाहिरीला काबूल येथील एका घरात ट्रॅक केलं. या घरात जवाहिरी त्याच्या कुटुंबीयांसोबत लपून बसला होता. बायडेन यांनी गेल्याच आठवड्यात जवाहिरीचा खात्मा करण्याच्या या ऑपरेशनला मंजुरी दिली आणि अमेरिकेने ही मोहीम फत्तेही केली.
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ट्विट करून या ऑपरेशनची माहिती दिली आहे. माझ्या आदेशानतंर शनिवारी संयुक्त राज्य अमेरिकेने अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये यशस्वीपणे एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईकमध्ये अल कायदाचा मोहरक्या अयमान अल जवाहिरीचा खात्मा झाला आहे. आता न्याय पूर्ण झाला आहे. अफगाणिस्तान आणि इतर देशातील दहशतावादाविरोधातील अभियान सुरूच राहील हे मी अमेरिकन नागरिकांना वचन दिलं होतं. ते आम्ही करून दाखवलं आहे. जवाहिरी बिन लादेनचा नेता होता. 9/11च्या हल्ल्यावेळी तो लादेनचा सहकारी होता. तसेच हा हल्ला घडवून आणण्यात त्याचा सहभाग होता, असं बायडेन यांनी म्हटलं आहे.
आता हे पुन्हा नाही. पुन्हा नाही. अफगाणिस्तानात अतिरेक्यांना आश्रय दिला जावू नये. जवाहिरी मारला गेला आहे. आता अफगाणिस्तानात पुन्हा असं घडू नये याची खबरदारी घेणार आहोत. एक दहशतवादी मारला गेला आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
अल जवाहिरी आणि ओसामा बिन लादेन यांनी 9/11च्या हल्ल्याचा कट रचला होता. या हल्ल्यानंतर सामान्य अमेरिकेन नागरिकांना पहिल्यांदाच अल कायदा या अतिरेकी संघटनेची माहिती मिळाली होती. या हल्ल्यानंतर 2 मे 2011 रोजी अमेरिकेने पाकिस्तानात घुसून ओसामा बिन लादेनचा खात्मा केला होता. अमेरिकन सैनिकांनी देश सोडल्यानंतर 11 महिन्यानंतर हे ऑपरेशन यशस्वी पार पाडलं आहे. हे ऑपरेशन म्हणजे बायडे प्रशासनाचा मोठा विजय आणि यश मानलं जात आहे.