महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात रंगत आली आहे. मतदानास काही दिवस राहिले आहे. त्यावेळी अमेरिकेतून बातमी आली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डेमोक्रेटीक पक्ष कर्जात बुडाला आहे. रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रेटीक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरीस यांचा पराभव केला होता. या निवडणुकीसाठी डेमोक्रेटीक पक्षाने एक अब्ज डॉलर रुपयांचा निधी जमवला होता. परंतु प्रचारात त्यापेक्षा कितीतरी पट जास्त पैसा खर्च केला. यामुळे डेमोक्रेटिक पक्ष कर्जात बुडाला आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.
पॉलिटिकोच्या रिपोर्टनुसार, कमला हॅरिस आणि टिम वॉल्ज यांनी प्रचार मोहिमेसाठी एक अब्ज डॉलरची रक्कम जमवली होती. परंतु प्रचारात त्यापेक्षा कितीतरी जास्त खर्च झाला. यामुळे डेमोक्रेटीक पक्षावर आता दोन कोटी डॉलर कर्ज झाले आहे. त्यासंदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
सोशल मीडिया X वर पोस्ट करत ट्रम्प यांनी म्हटले की, राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विक्रमी निधी जमा करणाऱ्या डेमोक्रेटीक पक्षाकडे आता काहीच राहिले नाही, हे पाहून मला धक्का बसला आहे. त्यांचे कर्ज वाढले आहे. कर्ज देणारे व इतर संस्था त्यांच्याकडून थकबाकीची मागणी करत आहेत. या कठीण काळात आम्ही त्यांच्यासाठी जे काही करू शकतो ते करू.
एकाप्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटीक पक्षाला मदतीची ऑफर दिली. या कठीण काळात आम्हाला मदत करायची आहे. आमच्याकडे खूप पैसा आहे. संपूर्ण प्रचार मोहिमेदरम्यान लोकांनी आम्हाला खूप मदत केली. यामुळे आम्हाला जास्त खर्च करण्याची गरज नव्हती.
दरम्यान आता डेमोक्रॅटिक पक्षातूनही विरोधाचे आवाज उठू लागले आहेत. रिपोर्टनुसार, अनेक नेत्यांनी निवडणूक निधीच्या बेफिकीर वापराबाबत प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. रिपोर्टनुसार, 16 ऑक्टोबरपर्यंत कमला हॅरिस यांच्याकडे $118 दशलक्ष निधी शिल्लक होता. एक माजी डेमोक्रॅट म्हणाला की आम्ही मूर्खांसारखे पैसे खर्च केले. आमच्याकडे रणनीती नव्हती.