इस्लामाबाद : संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्याने भारताने गुरुवारी तुर्कस्तान आणि पाकिस्तानवर जोरदार हल्ला केला होता. भारताने तुर्कस्तानला आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करण्याचा सल्ला दिला होता. तर पाकिस्तानला आधी दहशतवादावर बोलण्याचा सल्ला दिला. जम्मू-काश्मीर आणि लडाख हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे भारताने पुन्हा एकदा जगाला सांगितले. याबाबत पाकिस्तानी जनतेला काय वाटते यावर एका युट्युबरने पाकिस्तानी लोकांची प्रतिक्रिया घेतली आहे.
पाकिस्तानी यूट्यूबर सना अमजदने लोकांसोबत चर्चा केली. इम्रान खान यांनी भारतासोबत व्यापार बंद केल्याचे त्याच्यावर लोकांनी प्रतिक्रिया दिली. भारताव्यतिरिक्त पाकिस्तानला लागून असलेल्या अफगाणिस्तान आणि इराणशी देखील वाद आहेत. भारतासोबत व्यापार झाला पाहिजे असे काही लोकांनी म्हटले आहे. काही लोकं म्हणाले की, आपलेच खायचे वांदे आहेत आणि आपण काश्मीरला पाकिस्तानात यायला सांगतोय. ते येथे का येतील. जेथे ३० रुपये किलो पीठ मिळतं. तेच आपल्याकडे महाग आहे.
आणखी एका व्यक्तीने संभाषणात सांगितले की, पाकिस्तानचे लोक आता मुक्त आहेत का? हाच प्रश्न आहे. पाकिस्तानची परिस्थिती पॅलेस्टाईनसारखी झाली आहे, तिथे लोक मारले जात आहेत. आणखी एका व्यक्तीने सांगितले की, काश्मिरींना आपल्याकडे यायचे आहे का हाच प्रश्न आहे. काश्मीरला पाकिस्तान सोबत यायचे नाहीये. तो पाकिस्तानात येऊन महागडे पीठ खरेदी करेल. आम्हाला फक्त मतदानाचा अधिकार होता. तीही चोरीला गेला आहे.
पुढे एका व्यक्तीने म्हटले की, भारतासोबत व्यापार व्हायला हवा, तरच पाकिस्तानची महागाई कमी होईल. बलुचिस्तानमधील एका व्यक्तीने संभाषणात सांगितले की, काश्मीरबद्दल बोलणे सोपे आहे. पण बलुचिस्तानमध्ये रोज बॉम्बस्फोट होत आहेत. रोज माणसे मारली जात आहेत. त्यावर नियंत्रण ठेवणे सरकारला शक्य नाही. या व्यक्तीने पुढे विचारले की, जे काम लाहोरमध्ये होते ते बलुचिस्तानमध्ये होत नाही. तो पाकिस्तानचा भाग नाही का?