न्यूयार्क, दि. 30 नोव्हेंबर 2023 | अमेरिकेत खलिस्तानी अतिरेकी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा प्रयत्न करण्याचा आरोप भारतावर झाला आहे. काही दिवसांपूर्वी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येवरुन भारत आणि कॅनडा सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. दोन्ही देशातील संबंध बिघडले होते. आता पन्नू याच्या हत्येच्या प्रयत्नात अमेरिकन पोलिसांचे आरोपपत्र दाखल झाले आहे. त्या आरोप पत्रात खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येचा कट भारतीय अधिकाऱ्याने रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. न्यूयार्कमधील वकील डेमियन विलियम्स यांनी यासंदर्भात माहिती दिली. भारत सरकारमधील एका अधिकाऱ्याने सांगितल्यानंतर 52 वर्षीय निखिल गुप्ता याने ही हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. यामुळे भारत आणि अमेरिकेतील संबंधावर परिणाम होऊ शकतो.
अमेरिकेतील न्याय विभागाकडून यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, एका भारतीय सरकारी अधिकारी याच्या निर्देशावरुन निखिल गुप्ता याने गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा प्रयत्न केला. निखिल गुप्ता हा आंतरराष्ट्रीय तस्कार असून ड्रग्स आणि शस्त्रांची तस्करी करतो. पन्नू हा खलिस्तान आंदोलनाचा प्रमुख नेता आहे.
१८ जून रोजी कॅनडा येथील गुरुद्वारात हरदीपसिंग निज्जर याची हत्या झाली होती. पन्नू हा निज्जर याचा सहकारी होता. त्यानंतर १९ जून रोजी निखिल गुप्ता याने अमेरिकन अधिकाऱ्यांना सांगितले की, पन्नूही त्यांच्या टार्गेटवर होता. अमेरिकेतील न्याय विभागाकडून पन्नू आणि निज्जर यांचा हत्येचा संबंध जोडला आहे. या प्रकरणात भारतीय अधिकारी हा भारताच्या गुप्तचर संस्थेत कार्यरत आहे. निखिल गुप्ता आणि त्याच्यात ८३ लाखांत ही डील झाली होती.
न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या नॅशनल सिक्योरिटी काउंसिलच्या प्रवक्ता एड्रियन वॉटसन यांनी राष्ट्रध्यक्ष जो बायडेन प्रशासनयासंदर्भात माहिती दिली होती. त्यात निखिल गुप्ता आणि भारतीय अधिकारी सहभागी असल्याचे म्हटले होते. त्यानंतर जो बायडन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर हा मुद्दा उपस्थित करत चिंता व्यक्त केली होती. भारत सरकारने हे प्रकरण गंभीरतेने घेण्याचे आश्वासन दिले होते.