लंडन: महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या विषयीचे अनेक किस्से आता बाहेर येऊ लागले आहेत. महाराणींचं बालपण, शिक्षण, त्यांची शिस्त, निर्णय, शाहीथाट आणि त्यांच्या स्वभावाची माहितीही आता समोर येऊ लागली आहे. अशातच त्यांच्या शाही महालाचीही आता चर्चा सुरू झाली आहे. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी गेली सात दशके राजगादी सांभाळली. त्या लंडनमधील (London) शाही महालात राहत होत्या. त्यांचा शाही महाल बकिंगहॅम पॅलेस (Buckingham Palace) या नावाने ओळखला जातो. महाराणींकडे विंडसर कॅसल, सँड्रिघम हाऊस आणि बालमोरलसहीत अनेक इतर रेसिडेन्स हाऊस होते. परंतु या सर्वांमध्ये बकिंगहॅम पॅलेस सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहे.
बकिंगहॅम पॅलेस लंडनमध्ये आहे. हा अतिविशाल पॅलेस केवळ लंडनच नव्हे तर संपूर्ण जगासाठी कुतुहूलाचा विषय आहे. हा पॅलेस आतून खूप आलिशान दिसतो. बकिंगहॅम पॅलेसच्या जवळ व्हिक्टोरिया ट्यूब स्टेशन, ग्रीन पार्क आणि हाईड पार्क कॉर्नर आहेत. या महालाच्या आसपास बसने जाता येते. जर ट्रेनने जायचं असेल तर व्हिक्टोरिया कोच स्टेशनला उतरावे लागते. तिथून हा पॅलेस पायी दहा मिनिटाच्या अंतरावर आहे.
बकिंगहॅम पॅलेस 1837पासून ब्रिटनच्या शासकांचं ऑफिशियल निवास राहिला आहे. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा हा शाही महाल दरवर्षी उन्हाळ्यात पर्यटकांसाठी खुला ठेवला जातो. ब्लूमबर्गच्या मते, या शाही पॅलेसची किंमत सुमारे 341 अब्ज रुपये आहे.
ब्रिटनची वेबसाईट रॉयल कलेक्शन ट्रस्टच्या मते, या शाही महालात एकूण 775 खोल्या आहेत. त्यात 19 स्टेट रूम आहेत. तसेच 52 रॉयल आणि गेस्ट बेडरूम आहेत. यात 188 स्टाफ रुमचाही समावेश आहे. या शिवाय 92 ऑफिस आणि 78 बाथरूमचारही त्यात समावेश आहे.
या शाही महालाची रुंदी 108 मीटर आणि खोली 120 मीटर आहे. पाहतानाच हा महाल अत्यंत भव्यदिव्य वाटतो. या महालात अनेक शाही कार्यक्रम होतात. या महालाला विदेशी राष्ट्राध्यक्ष आवर्जुन भेट देत असतात.
शाही भोजन, लंच, डिनर, रिसेप्शन आणि गार्डन पार्टींसाठी दरवर्षी या महालात सुमारे 50 हजाराहून अधिक लोक सहभागी होतात. ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबतच्या विकली मिटिंग्स आणि विशेष राजदूतांचं स्वागतही याच पॅलेसमध्ये होतं.
उद्योग, सरकार, डोनेशन, खेळ, राष्ट्रमंडल आणि इतर विभागात काम करणाऱ्या लोकांचा याच महालात सन्मान केला जातो. बकिंगहॅम पॅलेसकडे नॅशनल इव्हेंटचं सेंटर म्हणूनही पाहिलं जातं.